Rahul Gandhi criticizes PM Narendra Modi for calling Gautam Adani case personal
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. दोन दिवसीय या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच भेट आहे. यामुळे ट्रम्प आणि मोदी यांच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि करार झाले आहेत. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.
या पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे समोर आले आहेत. उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेत दाखल झालेल्या खटल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का? असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत एक लोकशाही आहे आणि आपली संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम’ आहे, आम्ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानतो. प्रत्येक भारतीय माझा आहे असे मला वाटते. दोन देशांचे दोन सर्वोच्च नेते कधीही अशा वैयक्तिक मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल गांधींनी लिहिले आहे की, “देशात प्रश्न विचारला तर गप्प राहतात. विदेशात प्रश्न विचारला तर खासगी मुद्दा असल्याचं म्हणतात. अमेरिकेत मोदींनी अदाणींच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकला.जेव्हा मित्राचा खिसा भरणं मोदींसाठी राष्ट्रनिर्माण आहे, तेव्हा लाचखोरी आणि देशाची संपत्ती लुटणं व्यक्तिगत मुद्दा बनतो.” अशा शब्दांत राहुल गांधींनी टीका केली आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. यापूर्वी देखील संसदेमध्ये आणि संसदेच्या आवारामध्ये राहुल गांधी यांनी गौतम अदानींवरुन मोदी सरकारला घेरले आहे. मोदी सरकार हे अदानींसाठी निर्णय घेतात असा आरोप राहुल गांधींकडून केला जातो. त्याचप्रमाणे धारावी विकास प्रकल्पावरुन देखील राज्यातील नेते गौतम अदानींवर टीका करत असतात. यानंतर अमेरिका सरकारने देखील गौतमी अदानींवर आरोप केल्यामुळे देशामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०२४ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या न्याय विभागाने दाखल केलेल्या खटल्यात गौतम अदाणी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आरोपांनुसार, सौरऊर्जेच्या करारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी अदाणी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे २,१०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे व्यवहार अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवण्यात आले होते ज्यांच्याकडून अदाणी समूहाने अब्जावधी डॉलर्स उभारले आहेत.