Rahul Gandhi, Sonia Gandhi, Priyanka Gandhi pay their respects to former Prime Minister Manmohan Singh
दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थविषयातील तज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांनी काल (दि.26) अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून दिल्लीमध्ये त्यांच्या घरी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांनी काल (दि.26) रात्री 9.51 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या (दि.28) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये असून उद्यापर्यंत त्या दिल्लीमध्ये येणार आहे. यानंतर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. सध्या मनमोहन सिंग यांचे पार्थिव हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्याशी चर्चा देखील केली होती.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जीवनप्रवास जाणून घ्या एका क्लिकवर
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पूर्ण परिवारासह डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांनी एकत्रितपणे पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच त्यांना पुष्पांजली वाहिली आहे. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित होते. कॉंग्रेसच्या या सर्व नेत्यांनी श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्याला सलाम केला. तसेच कुटुंबियांना देखील धीर दिला आहे. मनमोहन सिंग यांची कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि देशाप्रती समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, अशा भावना देखील कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Leaders pay their last respects to former PM Late Dr. Manmohan Singh ji. https://t.co/1ccSeTdZc7
— Congress (@INCIndia) December 27, 2024
त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकाळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे नेते देखील उपस्थित होते. त्यांनी पुष्पचक्र वाहून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या अर्थक्षेत्रातील कार्याला सलाम केला आहे.
देश के पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी को श्रद्धांजलि 🙏 pic.twitter.com/tcC4TizGYO
— Congress (@INCIndia) December 27, 2024
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “मनमोहन जी यांच्या निधनाने प्रत्येकाच्या हृदयात खूप दुःख झाले आहे. हे एक राष्ट्र म्हणून आपले मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावून भारतात येणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करणे सामान्य नाही. उणीवांच्या वरती उठून उंची कशी गाठता येते, हे त्यांचे जीवन नव्या पिढीला शिकवत राहील. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी विविध पातळ्यांवर योगदान दिले. लोकांप्रती आणि देशाच्या विकासाप्रती त्यांची बांधिलकी नेहमीच आदराने पाहिली जाईल. मनमोहन सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते. त्यांची नम्रता, सौम्यता आणि बुद्धिमत्ता हे त्यांच्या संसदीय जीवनाचे वैशिष्ट्य ठरले, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.