Rahul Gandhi
नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नावाला जोर दिला जात होता. त्यानंतर अखेर राहुल गांधी हेच लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी म्हटले की, ‘काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद 10 वर्षांनंतरही रिक्त राहणार नाही. राहुल गांधी पाचव्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.
यासोबतच त्यांनी संघटनेत इतरही अनेक पदे भूषवून योगदान दिले आहे. परंतु, पहिल्यांदाच ते संसदीय पद सांभाळतील. लोकसभा खासदारांच्या शपथविधीच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी पुढच्या रांगेत बसले होते. अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड केल्याची माहिती दिली.
विरोधी पक्षनेते असल्याने राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची अधिक संधी मिळेल, असा विश्वास काँग्रेसला आहे. यासोबतच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने मीडियामध्येही स्थान मिळेल.
ते दबावाखाली येणार नाही
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राहुल गांधी कोणाच्याही दबावाखाली येऊ शकत नाहीत. तर इतर नेते पंतप्रधानांच्या दबावाखाली येतात. याशिवाय सरकारच्या अनेक महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमध्येही विरोधी पक्षनेते कायदेशीररित्या उपस्थित असतात. राहुल गांधीही या संधीचा चांगला उपयोग करू शकतात.