ओडिशात 275 जणांचा बळी घेणारा रेल्वे अपघात हा घातपातातूननवी दिल्ली – ओडिशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या 3 रेल्वेंच्या अपघातात (Odisha Raial Accident) 275 जणांचा बळी गेला आणि 1100 हून अधिक जण या अपघातात जखमी झालेत. आता हा अपघात घातपातातून ( conspiracy) घडवल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. इलेक्टरॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेत ( Inter locking system) फेरफार करुन घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या अपघाताला ट्रेनचा ड्रायव्हर किंवा सिग्नल यंत्रणा जबाबदार नसल्याचं समोर आलेलं आहे. या अपघाताचं मूळ कारण आणि हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं सांगत हा कट रचणाऱ्या व्यक्तींची ओळख पटल्याचा दावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही केलाय. दरम्यान या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 नसून 275 असल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
अपघातापूर्वी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या सेटिंगमध्ये बदल करण्यात आल्याचा संशय रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर या अपघाताची सीबीआय चौकशी करावी, अशी शिफारस करण्यात आल्याचं रेल्वेमंत्र्यांनी रविवारी संध्याकाळी जाहीर केलंय.
या अपघाताचा कवच या यंत्रणेशी काहीही संबंध नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. पॉइंट मशीनच्या सेटिंगमध्ये काही बदल करण्यात आल्याचं समोर आल्याचंही वैष्णव यांनी सांगितलंय. हे सगळं का घडवण्यात आलं, हे चौकशीत समोर येईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय. अपघाताचा संबंध पॉईंट मशीन आणि इंटरलॉकिंगशी संबंध असल्याचं सांगण्यात आलंय. हे बदल का करण्यात आले, याचा शोध आता घेण्यात येतोय.
पॉइंट मशीन हे तातडीनं कारवाई करण्यासाठी आणि पॉइंट स्वीटला लॉक करण्यासाठी सिग्नल यंत्रणेतील महत्त्वाचं उपकरण आहे. या यंत्रणेनं काम केलं नाही तर वाहतूक नियंत्रणावर गंभीर परिणाम होतो. हे उपकरण सुरु करताना त्रुटी असल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते.
पॉईंट मशीनमधील या बिघाडामुळे कोरोमंडल एक्सप्रेस ही मुख्य रेल्वे रुळांऐवजी लूप लाईनमध्ये म्हणजे दुसऱ्या रुळांवर शिरली. आणि या एक्सप्रेसची धडक मालगाडीला झाली. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.