लोकसभा निवडणुकीच्या ( loksabha election 2024) रणधुमाळी आज (1 जून) शेवटच्या टप्प्यात मतदान सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात देशातील 8 राज्यांमध्ये एकूण 57 जागांवर मतदान सुरु आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यानंतर काही मिनिटात एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. याचदरम्यान भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेबद्दल अजबच दावा केला आहे. त्यांच्या या वक्त्यव्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे.
गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशन यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारीतील ध्यान आणि उष्माघाताबद्दल सांगितले. रवी किशन यांना सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कन्याकुमारीमध्ये साधना करून सूर्यदेवाला शांत केले आहे.
काय म्हणाले रवि किशन?
गोरखपूरमध्ये मतदान केल्यानंतर भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “पीएम मोदींनी कन्याकुमारीमध्ये साधना करून सूर्यदेवाला शांत केले आहे. आज कडक उन्हात वारे वाहू लागले आहेत. हे रामराज्याचे फार मोठे लक्षण आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी प्रचंड फॉर्मात येतील आणि माझा भारत खूप विशाल आणि विकसित होईल, सोने की चिड़िया होईल, भारत कधीही झुकणार नाही, भारतासमोर लोक झुकतील.” असं यावेळी रवि यांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर रवी किशनचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अति उष्माघात आणि उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणावरून रवी किशन यांना ट्रोल केले जात आहे.
उल्लेखनीय आहे की, शुक्रवारी उत्तर प्रदेशात उष्माघातामुळे देशभरात ३२० हून अधिक मृत्यू झाले आहेत. येथे उष्णतेच्या लाटेमुळे अवघ्या एका दिवसात १९९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १९ मतदान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.