'चूक दुसऱ्याची, मी स्पष्टीकरण का देऊ?; अखेर मतदान ओळखपत्रावरून तेजस्वी यादव यांनी सोडलं मौन
बिहारमध्ये सध्या मतदार यादी विशेष फेरपडताळणीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच मतदार ओळखपत्र म्हणजेच EPIC कार्डवरून गोंधळ सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहेत. निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांचीच दोन ओळखपत्र असल्याचा आरोप करत नोटीस धाडली होती. त्यावर आता तेजस्वी यादव यांनी मौन सोडलं आहे.
Rahul Gandhi Press : राहुल गांधी यांनी थेट दाखवले पुरावे! निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप
गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी तेजस्वी यादव यांनी या संपूर्ण वादावर मौन सोडले आणि स्पष्ट केले की त्यांना निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत कोणतीही सूचना मिळालेली नाही. पाटणा नोंदणी विभागाकडून फक्त एकच पत्र मिळाले आहे आणि त्याचं योग्य उत्तर दिलं जाईल. जर दोन EPIC क्रमांक जारी केले गेले असतील तर चूक करणाऱ्या व्यक्तीला का पकडलं जात नाही?, असा सवाली त्यांनी केला आहे.
२ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी दावा केला होता की, त्यांचा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक बदलण्यात आला आहे. त्यानंतर, पाटण्याच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (ERO) त्यांच्याकडून EPIC कार्डची माहिती आणि कागदपत्रे मागितली होती.
निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वीही माहिती मागितली होती, परंतु आतापर्यंत EPIC कार्डची प्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यांनी तेजस्वी यादव यांना ८ ऑगस्टच्या दुपारपर्यंत सर्व माहिती देण्यास सांगितले आहे, जेणेकरून चौकशीची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
तेजस्वी यादव यांच्या आरोपांबाबत, निवडणूक आयोगाने नोंदींचा आढावा घेतला आणि सांगितले की तेजस्वी यांचे नाव मतदान केंद्र क्रमांक २०४ (बिहार अॅनिमल सायन्स युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालय इमारती) च्या अनुक्रमांक ४१६ वर नोंदणीकृत आहे. निवडणूक आयोगाच्या मते, त्यांचा अधिकृत EPIC क्रमांक RAB0456228 आहे. तर पत्रकार परिषदेत तेजस्वीने नमूद केलेला क्रमांक यापेक्षा वेगळा होता.
नोटिसीला उत्तर दिलं जाईल, पण जर EPIC क्रमांकात काही चूक असेल तर त्यांना जबाबदार धरता येणार नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या व्यक्तीने चूक केली आहे त्याला उत्तर का विचारले जात नाही?, असं त्यांनी म्हटलं आहे.