Robbery
वैशाली : वैशाली जिल्ह्यातील लालगंज येथील तीनपुलवा चौकात असलेल्या अॅक्सिस बँकेवर (Robbery in Axis Bank) मंगळवारी मोठा दरोडा पडला. दोन दुचाकींवर आलेल्या पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. बँकेत प्रवेश करताच चोरट्यांनी बँकेचे सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. त्यानंतर दरोड्याची घटना घडली.
एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा ऐवज लुटून चोरट्यांनी पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. पोलिसांचे पथक या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. या घटनेमुळे लालगंज तीनपुलवा चौकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वेळात ही बातमी आगीसारखी पसरली. घटनेनंतर घटनास्थळी लोकांची गर्दी होऊ लागली. पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
दरोडा टाकताना चोरट्यांनी सीसीटीव्हीची हार्डडिस्कही सोबत नेल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, बँक उघडताच पाच चोरटे दोन दुचाकींवर आले आणि त्यांनी बँक लुटली. काही कर्मचाऱ्यांनी ते नुकतेच फिल्डवरुन आल्याचे सांगितले. त्यांना याबाबत काहीच माहिती नाही.
यापूर्वीही दोन बँका लुटल्या
बँक लुटण्याची घटना घडवून बेधडक चोरट्यांनी पोलिस प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. बिहारमध्ये बँक लुटण्याची ही पहिली घटना नाही. गत महिन्यात नालंदा जिल्ह्यातील ग्रामीण बँकेतून 14 लाख रुपये आणि मुझफ्फरपूर जिल्ह्यातील उत्तर बिहार ग्रामीण बँकेतून सुमारे 9 लाख रुपये लुटण्यात आले होते.