RSS General Secretary Dattatreya Hosabale's statement regarding Aurangzeb's tomb
नवी दिल्ली : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट देशभरामध्ये प्रदर्शित झाला. यानंतर औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर हा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी देखील ही कबर उखडून टाकावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या औरंगजेबाच्या कबरीमध्ये यापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतर आता सरचिटणीस दत्तात्रय होसबळेंचे यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी सरकार घेत असलेली भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच बाहेरच्या लोकांना आदर्श मानण्यापेक्षा या मातीतील लोकांना आदर्श मानण्याबाबत देखील वक्तव्य केले. दत्तात्रय होसबळे म्हणाले की, “समाजात कुठलाही विषय समोर येऊ शकतो. औरंगजेब मार्गाचं नाव बदलून ते अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलंच. जे लोक गंगा आणि यमुना यांचा आदर करतात अशा लोकांनी औरंगजेबाला त्यांचा आयकॉन बनवलं. असे लोक औरंगजेबाच्या भावाविषयी काहीही बोलत नाहीत,” अशी टीका दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे दत्तात्रय होसबळे म्हणाले की, “बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श ठरावयचं की इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान करायचा हा खरा प्रश्न आहे. आक्रमक मानसिकतेचे लोक भारतासाठी संकट आहेत. अशाच प्रवृत्तीचे लोक औरंगजेबाचं महत्त्व वाढवत आहेत. वक्फ बोर्डबाबत ज्या सध्या चर्चा सुरु आहेत त्या समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहेत. तसंच अयोध्येत झालेलं राम मंदिर हे फक्त संघ नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रयत्नांचं प्रतीक आहे,” असे स्पष्ट मत दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले.
पुढे दत्तात्रय होसबळे यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरु असलेल्या अत्याचारांवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्या विरोधात आम्ही संघाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर होणारे अन्याय, त्यांच्या विरोधात कट करुन केली जाणारी हिंसा, त्यांच्यावरचे अन्याय तसंच शोषण याबाबत आम्ही निषेध नोंदवला आहे हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि एकजूट करुन राहिलं पाहिजे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरमध्ये झालेल्या हिंसा आणि दंगलवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली होती. बंगळुरूमध्ये लवकरच संघाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होणार आहे. यावेळी औरंगजेबाच्या कबरीबाबत काय चर्चा होणार याची चर्चा सुरु आहे.