Maneka Gandhi News : मोहम्मद साहब स्वतः शाकाहारी होते असा दावा भाजपच्या महिला खासदार (BJP MP ) मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी सुलतानपूरमध्ये केला. एवढंच नाही तर आपण स्वत: 40 ते 50 वेळा कुराण वाचल्याचंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या या दाव्याने एकंच खळबळ उडालेली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार मनेका गांधी सध्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी खासदार मनेका गांधी यांनी शाळेचे व्यवस्थापक आणि शिक्षकांना कुराण, बायबल आणि गीता आदी धार्मिक पुस्तके मुलांना शिकवण्याचा सल्ला दिला. मनेका गांधी म्हणाल्या की, त्यांनी स्वत: कुराण 40-50 वेळा वाचले आहे, कोणताही धर्म किंवा समुदाय हिंसाचाराबद्दल बोलत नाही. प्रत्येकजण आपापसात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याबद्दल बोलतो. एवढंच नाही, मोहम्मद साहेब स्वतः शाकाहारी होते.
मनेका गांधी यांनीही यावेळी गुणवंत मुलांचा गौरव केला. मनेका गांधी म्हणाल्या की, सुलतानपूरमध्ये टॅलेंटची कमतरता नाही.सुलतानपूरच्या मुलांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर देश-विदेशात नावलौकिक मिळवला आहे. मुलांना सर्व धर्माची माहिती असायला हवी, असेही त्या म्हणाल्या.
दोस्तपूर आणि कादीपूर नगर पंचायत निवडणूक रॅली
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, मनेका गांधी यांनी सुलतानपूर, दोस्तपूर आणि कादीपूरच्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलींमध्ये भाजप उमेदवारांसाठी मते मागितली. त्या पुढे म्हणाल्या की, शहरी आणि ग्रामीण भागात शौचालये, घरे, गॅस कनेक्शन, मोफत धान्य आदी सुविधा देऊन गरिबांचे जीवन बदलण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. यावेळी दोस्तपूर आणि कादीपूर नगर पंचायतींमध्ये हा समज मोडीत निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढचा अध्यक्ष भाजपचाच असेल.
बिरसिंगपूर रुग्णालयात लवकरच 10 डॉक्टर रुजू होणार
मनेका गांधी म्हणाल्या की, बीरसिंहपूरमध्ये डॉक्टरांच्या तैनातीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे. लवकरच रुग्णालयात १० डॉक्टर उपलब्ध होतील. लवकरच सुलतानपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रा नोंदणी केंद्राची सुविधाही सुरू करण्यात येणार असल्याचं खासदार मनेका गांधी यांनी स्पष्ट केले.