समृद्धी महामार्गावरच केला गेला 'मॉक ड्रिल'; 85 अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारीही सहभागी
वाशिम : दहशतवादी हल्ल्यावर मात करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कारंजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर रंगीत तालीम घेण्यात आली. ही तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या उपस्थित घेण्यात आली.
समृद्धी टोल नाका येथे एक संशयित वाहन खूप वेळेपासून उभा असून, त्यामध्ये एक बॉक्स आहे. असे दिसून येत आहे. ते काही घातपात घडवून आणण्याचे उद्देशाने तेथे ठेवले आहे, अशी माहिती समजल्याने आमचे अधिनस्त असलेले सर्व पोलिस यंत्रणा सतर्क करुन घटनास्थळावर तत्काळ रवाना करण्यात आले. त्या अनुषंगाने घटनास्थळावर रवाना करण्यात आलेल्या यंत्रणेमधील पथक यांनी संबंधित ठिकाणाची तपासणी केली.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्याजवळ एक चारचाकी वाहन (एम ३७/ एडी १२९७) दिसून आले. बीडीडीएस पथकांनी डॉग स्कॉडद्धारे व इतर बॉम्ब शोधक नाशक यंत्राद्वारे पाहणी केली. तपासणी दरम्यान स्फोटकाचे एक बॉक्स आढळून आल्याने व त्यामध्ये काही बॉम्बसदृष्य वस्तू आढळून आल्याने तंत्रज्ञानी उपकरणाच्या साहायाने सदर बॉम्बसदृश्य वस्तू निष्क्रीय केली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, कारंजा व स्थानिक गुन्हे शाखाच्या अधिकाऱ्यांनी वेग-वेगळे पोलिस पथक तयार करुन तपास कामी व आरोपी शोधकामी रवाना करण्यात आले.
८५ अधिकारी व अंमलदार, कर्मचाऱ्यांनी सहभाग
यासाठी रंगीत तालीम उपविभागीय पोलिस अधिकारी कारंजा, ठाणेदार कारंजा (शहर), कारंजा ग्रामीण अंमलदार, पोलिस अधिकारी स्थागुशा, एसआयडी वाशिम अधिकारी, एडीएस वाशिम युनिट अधिकारी, प्रभारी अधिकारी बीडीडीएस, वाशिम प्रभारी अधिकारी दविशा, वाशिम अंगुली मुद्रा विभाग अंमलदार व इतर प्रशासकीय यंत्रणेचे कर्मचारी असे एकूण ८५ अधिकारी व अंमलदार, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.