मोठी बातमी! टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी, एकजण ताब्यात!

धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये आले. तात्काळ तपासाची सूत्रं हलवण्यात आली. एका पथकाला रतन टाटा यांच्या सुरक्षेती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर दुसऱ्या पथकाला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमक्यांचे  फोन येण्याचे प्रकार सुरु आहे. मुंबईत घातपात करण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकार यापुर्वी समोर आले आहे. मात्र आता टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांंच्या नावाने धमकी देण्यात आली आहे.  रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) होतील, अशी धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी लगेच तपास सुरू करत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला तात्काळ बेड्या ठोकल्या.

  मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा फोन खणाणला

  मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये अज्ञात व्यक्तीनं फोन केला होता. हा फोन रतन टाटा यांच्याबाबत होता. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने रतन टाटा यांच नाव घेऊन धमकी दिली. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा ते सायरस मिस्त्री होतील, अशी धमकी त्या व्यक्तीनं दिली. फोन आल्यानंतर तात्काळ पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं वेगानं फिरवली आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोध घेतला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या, त्याच्या चौकशीत सदर व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.

  धमकी देणारा मनोरुग्ण

  मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्या कॅालरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.  पण कॉलरचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीनं आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीनं कॉलरचा शोध घेतला असता, त्याचं लोकेशन कर्नाटक असल्याचं समजलं. त्यानंतर धमकी देणाऱ्याचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुण्याचा रहिवासी असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ पुण्यातील (Pune News) घरी धडक दिली. त्यावेळी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. धमकीचा फोन करणारी व्यक्ती गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब समोर आली. तसेच, सदर व्यक्तीच्या पत्नीनं यासंदर्भातील तक्रार पोलिसांत केल्याचंही समोर आलं.

  चौकशीदरम्यान, कॉलरला स्किझोफ्रेनियाचा त्रास होता आणि त्यानं कोणालाही न सांगता घरून फोन घेतला आणि त्याच फोनवरून त्यानं मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन केला आणि रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक आजारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. त्यानं फायनान्समध्ये एमबीए केलं असून अभियांत्रिकीचंही शिक्षण घेतलं आहे.