
त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल; मद्रास हायकोर्टाचा मोठा आदेश (Photo Credit- X)
उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान तमिळनाडूचे ॲडव्होकेट जनरल विजय नारायण यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांचा स्टॅलिन यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा कोणताही विचार नाही. ॲडव्होकेट जनरल यांनी न्यायालयाला माहिती दिली की, “उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची स्टेशन जामिनावर सुटका केली जाईल. महिलांच्या सुरक्षेचे हित लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.”
पोलिसांनी चेन्नईतील नीलांगराई येथील निवासस्थानातून उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी तांजावर येथे नेले. कावेरी आंदोलन सभेतील सार्वजनिक भाषणाप्रकरणी त्यांच्यावर हा एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता. उदयनिधी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६१, ७९, १९२, १९६, २९६(ब), ३५१(२) आणि ३५२ तसेच ‘तमिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायदा’ (Section 4) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act Section 67) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ताबा मिळवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्या भाषणातील व्हिडिओ क्लिप्स एडिट करून ‘फेक नॅरेटिव्ह’ (Fake Narrative) पसरवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. “माझ्या भाषणातील शब्द ‘कट, कॉपी, पेस्ट’ करून मी जे बोललोच नाही ते माझ्या नावावर खपवले जात आहे. अशा कारवायांना मी घाबरणारा माणूस नाही. मी याविरोधात कायदेशीर लढा देईन,” असे सांगत त्यांनी पोलीस कारवाईचे वर्णन ‘कॉमेडी’ असे केले.
कावेरी आंदोलनादरम्यान सभेला संबोधित करत असताना, जमावातील काही लोकांनी त्रिषा, त्रिषा” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर प्रतिक्रिया देताना उदयनिधी म्हणाले, “पाणी दुसरीकडे कुठे पोहोचो ना पोहोचो, तिथे नक्की पोहोचले पाहिजे.” मात्र, त्यांनी लगेचच स्पष्टीकरण दिले की ते ‘कावेरीच्या पाण्याबद्दल’ बोलत होते.
या वक्तव्यानंतर ‘तमिळगा व्हेट्री कळघम’ (TVK) च्या महिला आघाडीने तांजावर पोलिसांत तक्रार दाखल केली. उदयनिधी यांनी अभिनेत्री त्रिषाला उद्देशून द्विअर्थी वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, डीएमके पक्षाने हे सर्व आरोप फेटाळले असून, उदयनिधी यांचे वक्तव्य सरकारच्या कामकाजावर होते, कोणत्याही व्यक्तीवर नव्हते, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.