एअर इंडियाच्या विमानाला हवेत जोरदार हादरे; हवेत ३०० फूट खाली गेलं विमान, १० प्रवासी, ४ क्रू सदस्य जखमी
Air India Flight: थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानाला मंगळवारी (4 ऑगस्ट 2026) उड्डाणादरम्यान तीव्र टर्ब्युलन्सचा फटका बसला. या घटनेत विमानाची उंची काही क्षणांत सुमारे ३०० फूटांनी घसरली, त्यामुळे विमानातील प्रवासी आणि केबिन क्रूमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत १० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य जखमी झाल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार, VT-EXO नोंदणी असलेले हे विमान अचानक तीव्र टर्ब्युलन्स किंवा अपड्राफ्ट-डाउनड्राफ्टच्या प्रभावाखाली आले. त्यामुळे विमानाच्या उंचीत अचानक बदल झाला. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानावर तातडीने नियंत्रण मिळवले आणि उड्डाण सुरक्षितपणे दिल्लीकडे सुरू ठेवले.
Tejas mk1a ge f404 Engine: वायुसेनेसाठी आनंदाची बातमी! तेजस MK-1A साठी GE कडून इंजिन पुरवठ्याला वेग
अचानक बसलेल्या जोरदार धक्क्यांमुळे अनेक प्रवाशांचा तोल गेला. काही प्रवासी आणि केबिन क्रू यांना किरकोळ दुखापती झाल्या. विमान दिल्ली विमानतळावर उतरण्यापूर्वीच विमानतळ प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यामुळे वैद्यकीय पथक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आधीच सज्ज ठेवण्यात आली होती. विमान सुरक्षितपणे उतरल्यावर सर्व जखमींची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले. एअर इंडियाने अधिकृत निवेदनात सांगितले की, प्रवाशांची सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता असून या घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल.
एअर इंडियाने या घटनेवर एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. एअरलाइनने असेही म्हटले आहे की, बाधित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे आणि या घटनेच्या तपासात संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जात आहे.
टर्ब्युलन्स म्हणजे उड्डाणादरम्यान वातावरणातील हवेचा दाब, वेग किंवा प्रवाह अचानक बदलल्याने विमानाला बसणारे जोरदार धक्के. अशा वेळी विमानाच्या उंचीतही अचानक बदल होऊ शकतो. त्यामुळे विमानप्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधून ठेवणे हा सर्वात सुरक्षित उपाय मानला जातो. अनेक विमान कंपन्या सीट बेल्टचा संकेत बंद झाल्यानंतरही बेल्ट बांधून ठेवण्याचा सल्ला देतात. सुदैवाने, वैमानिकाच्या तत्परतेमुळे विमान सुरक्षितपणे दिल्लीत उतरले आणि मोठा अपघात टळला. आता एअर इंडिया आणि संबंधित विमान वाहतूक प्राधिकरण या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करणार आहेत.






