नवी दिल्ली : कोर्टाकडून परवानगी घेऊन राज्यसभेत पोहोचलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेता आली नाही. कारण राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तुमचे प्रकरण सध्या विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित असल्याचे सांगत सिंह यांना खासदार म्हणून शपथ घेण्यास परवानगी नाकारली.
मद्य धोरण घोटाळ्यात ईडीकडून आप नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी आणि संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपल्याला जामीन मिळावा, अशी याचिका सिंह यांनी कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाकडून संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी राज्यसभेत हजर होण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठीची मागणी फेटाळून लावण्यात आली होती.
काय आहेत आरोप ?
ईडीने आपल्या आरोपपत्रात मद्य धोरण घोटाळ्यातील अन्य आरोपी दिनेश अरोरा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा आरोप केला होता. या बैठकीला संजय सिंह उपस्थित होते. दिनेश अरोरा यांनी ईडीसमोर दिलेल्या कबुली जबाबानुसार, संजय सिंह यांची पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेट झाली. यानंतर ते मनिष सिसोदिया यांच्या संपर्कात आले. दिल्ली निवडणुकीपूर्वी आप नेत्यांनी मिळून केलेला हा निधी उभारणीचा कार्यक्रम होता, असा मोठा आरोप करण्यात आला आहे.