New Hit And Run Law : देशभरातील बस आणि ट्रक ड्रायव्हर्सनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या ड्रायव्हर्सच्या युनियन्सनी देखील चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. ट्रक ड्रायव्हर्सच्या या आंदोलनाचे विविध राज्यात पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील नवी मुंबईत तर चक्क आंदोलक ड्रायव्हर्सनी पोलिसांनाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्सच्या या आंदोलनाने संपूर्ण देश पेटलाय. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन हिट अँड रन कायद्यामुळे हे आंदोलन होत आहे. त्यामुळे ट्रक आणि बस ड्रायव्हर्सना आंदोलन करायला भाग पाडणारा तो नवीन हिट अँड रन कायदा काय आहे? हे जाणून घेऊयात.
नवीन हिट अँड रन कायद्या विरोधात या राज्यांमधून विरोध
देशभरातील ट्रक ड्रायव्हर्सनी नवीन हिट अँड रन कायद्या विरोधात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह यासह अनेक राज्यात आंदोलन पुकारले आहे. गाझियाबादमध्ये तर ट्रक ड्रायव्हर्सच्या संपानंतर सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरीकांना त्यांच्या कामावर आणि घरी जाण्यास अडचण येत आहेत. एकूणच गाझियाबादमधली सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
नवी मुंबईत पोलिसांवर हल्ला
महाराष्ट्रातील नवी मुंबईत उलवे येथे बेलापूर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला होता. यावेळी रस्त्यावर उतरलेले ट्रक चालक हे फारच आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या ट्रक चालकांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण केली होती. तर उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा ट्रक चालकांनी प्रयत्न केला. ज्यानंतर एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले. तर काही ट्रक चालकांनी पनवेल-सायन महामार्ग रोखला असल्याने प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
नवीन कायदा काय?
यामध्ये आता अपघात झाल्यानंतर पळून जाणे हे हिट अँड रन समजले जाते. तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येत होती आणि जामीनही मिळत होता. बदलत्या नव्या नियमानुसार जर कोणी वाहनाला धडक दिली आणि चालक पोलीस प्रशासनाला न सांगता घटनास्थळावरून पळून गेला, तर त्याला 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि दंडही ठोठवला जाणार आहे. या कायद्याला चुकीचे ठरवत देशभरातून आंदोलन केले जात आहे.
पळ काढला तर…
हिट अँड रन प्रकरणांमध्ये सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी 50 हजार लोकांचा रस्त्यावर मृत्यू होतो. त्याविषयी गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत सांगितले की, नवीन कायद्यात सरकार हिट अँड रन प्रकरणांमध्ये कठोर तरतुदी करत आहे. या कायद्याअंतर्गत एखाद्या कारने एखाद्याला धडक दिली व अपगाघग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी चालकाने तिथेच टाकून पळ काढला. ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर त्या चालकाना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागणार आहे. तर जे चालक अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जातात किंवा अपघात झाल्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देतात त्यांना मात्र त्यातून दिलासा मिळणार आहे. आजपर्यंत याबाबतची आयपीसीमध्ये अशी तरतूद करण्यात आली नव्हती.
10 वर्षांचा तुरुंगवास
या कायद्याविषयी बोलताना वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे की, हा कायदा म्हणजे दुधारी तलावार आहे. अपघात झाल्यानंतर एखादा वाहनचालक मदत मागण्यासाठी थांबला असला तरी त्याच्यावर जमावाकडून हल्ला होण्याचा धोका असू शकतो. या प्रकारचे अपघात झाले तर अशा वेळी जमाव हिंसक झालेला असतो. मात्र वाहनचालक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून गेला तर मात्र त्याला कायद्यानुसार 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्यामुळे अशा अपघातांचा वाईट परिणाम वाहनचालकाच्या आयुष्यावर होणार आहे.त्यामुळे याच्या निषेधार्थसाठीच बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा दिल्ली आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यात ट्रक चालकांकडून जोरदार आंदोलन केले जाता आहे.
वाहनचालकांना दिलासा
या कायद्याविषयी चालकांकडून जोरदार आंदोलन केले जात असले तरी नव्या कायद्यानुसार अपघातग्रस्त व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वाहनासमोर आली, किंवा बेकायदेशीरपणे रस्ता ओलांडत असेल तर अशा वेळी वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा आणि त्याचबरोबर दंडही होणार आहे. तर चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्यास मात्र 10 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा मिळणार आहे.
चूक नसतानाही मोठी शिक्षा
कायद्यातील या तरतुदीमुळेच वाहनचालक चिंता व्यक्त करत आहेत. धुक्यामुळेही अनेक अपघात होऊन विपरित घटना घडत आहेत. त्यामुळे असे अपघात झाले तर मात्र कोणतीही चूक नसताना एखाद्या वाहनचालकाला मोठी शिक्षा भोगावी लागणार असल्याचे मत वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.






