नवी दिल्ली – विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी उमेदवारी दाखल केली. यानंतर त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यांच्यासोबत राहुल गांधी यांनीही महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
नामनिर्देशन कार्यक्रमादरम्यान विरोधकांनी एकजूट दाखवत शक्तीप्रदर्शन केले. २४ जून रोजी NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकनाच्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या दिग्गजांचा मेळावा झाला होता.
नामांकनावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिका अर्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होणार आहे, तर मतमोजणी २१ जुलैला होणार आहे. समीकरणाबद्दल बोलायचे तर विरोधी पक्षांची युती असलेल्या UPA कडे संख्याबळ कमी आहे. NDA कडे एकूण ५.२६ लाख मते आहेत, जी एकूण मतांच्या सुमारे ४९% आहेत. आणखी फक्त एक टक्का आवश्यक आहे. YSR काँग्रेस पक्ष किंवा बिजू जनता दलाच्या पाठिंब्याने हे साध्य होऊ शकते. बसपनेही द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचे बोलले आहे.