
नवी दिल्ली : आज देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 76 वर्ष आज पूर्ण झालीयेत. या 76 वर्षांत देशात बरचं काही बदललं आहे. देशानं विकासाच्या दिशेनं जगात स्वताचं एक स्थान निर्माण केलंय. मात्र त्यासोबतच काही बाबी बदललेल्याही आहेत. 1947 साली ज्या वस्तू काही पैशांत येत होत्या, त्यासाठी आता शंभरहून अधिक रुपये मोजावे लागतायेत. या सगळ्या काळात महागाई किती झपाट्यानं वाढली आहे, याची कल्पना यावरुन तुम्ही करु शकाल. घरातील अनेक वयोवृद्धांकडून स्वातंत्र्याच्या काळातील स्वस्ताईच्या कहाण्या आपण केव्हाना केव्हा ऐकलेल्या असतीलच. शंभर रुपयांत त्या काळी सोन्याचे दागिने घडवले जात असत, आता या कथा केवळ कथाच उरलेल्या आहेत. आजच्या तुलनेत त्यावेळी नेमकी स्वस्ताई तरी किती होती, हे विस्तारानं जाणून घेऊयात.
4 रुपयांत मिळत असे अमेरिकन डॉलर
ज्यावेळी 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी अमेरिकन डॉलरची रुपयातील किंमत होती केवळ 4 रुपये. आज त्याच एका डॉलरसाठी आपल्याला 83 रुपये मोजावे लागतायेत. स्वातंत्र्यांच्या या 76 वर्षांत भारतीय रुपयाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 पटींहून अधिक कमी झालेली आहे. रुपयाचं अवमूल्य़न, व्यापारातील असंतुलन, अर्थसंकल्पातील तोटा, मुद्रास्फिती, जागतिक इंधनांच्या किमंती, आर्थिक संकटं यासारखी अनेक कारणं यामागे आहेत. या सगळ्या कारणांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्यानं घसरत गेलाय.
सोन्याचे भाव 665 पट वाढले
स्वातंत्र्याच्या काळाशी तुलना केली तर आजचे सोन्याचे दर हे 665 पटींनी वाढलेले आहेत. जर स्वातंत्र्यावेळी तुम्ही सोनं खरेदी केलं असतं तर आज तुम्ही अब्जाधीश होऊ शकला असतात. स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याचा दर होता प्रति तोळा 88.62 रुपये. आज त्याच सोन्याच्या प्रतितोळ्यासाठी 59, 000 रुपये मोजावे लागतायेत. ज्यांनी त्या काळात सोन्यात गुंतवणूक केली त्यांना आत्तापर्यंतच्या काळात 66, 475 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
25 पैशांत एक लिटर पेट्रोल
1947 सालात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अत्यंत स्वस्त होत्या. त्यावेळी 25 पैसे प्रतिलिटर मिळत होतं. आज मुंबईसारख्या शहरांत पेट्रोलचे दर 106 रुपयांपर्यंत पोहचलेले आहेत. पेट्रोल प्रमाणेच इतरही अनेक वस्तूंचे दर हे प्रचंड कडाडलेले आहेत.
तांदूळ 12 पैसे किलो
स्वातंत्र्याच्या काळात तांदूळ 12 पैसे प्रति किलो मिळत होते, आता त्याच्यासाठी 60 ते 70 रुपये मोजावे लागतात. बटाटे त्यावेळी 25 पैसे प्रतिकिलो होते, त्याची आताची किंमत 30 रुपयांपर्यंत आलीय. सायकल त्यावेळी 20 रुपयांना मिळे आज सायकल घ्यायची झाली तर 8 ते 14 हजार मोजावे लागतायेत. त्यावेळी दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास केवळ 140 रुपयांत होत असे, आज त्यासाठी 7 हजारांपर्यंत किंमत द्यावी लागते.