म्हसवड : म्हसवड व परिसरातील जिल्हा परिषद शाळांना वैभव पोरे यांच्या प्रयत्नांतून उर्मी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अँफिनीटी एक्स प्रा.लि.च्या सीएसआर फंडातून १४ संगणक संचाचे वितरण करण्यात आले.
म्हसवड (विरकरवाडी, ता.माण) येथील विद्यालयात १४ संगणक संचाचे वितरण संबंधित शाळांना करण्यात आले. याप्रसंगी अँफिनीटी एक्स प्रा.लि.चे सिनियर मॅनेजर संतोष जाधव, उर्मी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष राहुल शेंडे, दुर्गसंवर्धनचे संतोष जाधव, वैभव पोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, सिध्देश्वर पोरे, नगरसेवक कैलास भोरे, शिवसेना शहराध्यक्ष राहुल मंगरूळे, मुख्याध्यापक कोकरे, उपशिक्षक लुनेश विरकर तसेच संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संतोष जाधव म्हणाले की, सध्याचे युग हे डिजीटल युग असून, विद्यार्थ्यांना जगाची ओळख आपल्या शाळेत बसून व्हावी. तसेच शिक्षकांनाही संगणकीय कामासाठी या संगणक संचाचा फायदा व्हावा या हेतूने वैभव पोरे यांच्या विनंतीवरून म्हसवड व परिसरातील जि.प.शाळांना संगणक संचांचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपले काहीतरी योगदान असावे, या हेतूने आम्ही काम करत आहोत. या सामाजिक, शैक्षणिक कार्यातून आम्हाला आनंद मिळण्याबरोबरच कामासाठी ऊर्जा ही मिळते.
उर्मी स्वंयसेवी संस्थेचे अध्यक्ष राहुल शेंडे यांनी सांगितले की, माणदेशाचा व माझा काही संबंध नसला तरी माणदेशी ग.दी.माडगळूकर व त्यांच्या कुटुंबियांच्या सहवासात राहण्याचे मला भाग्य मिळाले. त्यामुळे माणदेशाविषयी आपुलकी वाटत असून आपण माणपासून वेगळे नाही. यापुढेही माणदेशासाठी आपण असेच काम करत राहू.
दुर्गसंवर्धनचे मार्गदर्शक श्री संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र व दुर्ग इतिहास यावर सखोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात वैभव पोरे म्हणाले की जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा त्यांना डीजीटलच्या युगाची माहिती व्हावी. त्यासाठी ज्या शाळा संगणक संचापासून वंचित आहेत अशा शाळांना संगणक संच उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. उर्मी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अँफिनिटी एक्स प्रा.लि.यांच्याकडे आपण यासंदर्भात मागणी केली होती. त्यांनी क्षणाचा विलंब न करता आपल्या माणदेशात त्यांनी मदत जाहीर करत आज गरजू शाळांना या संचाचे वितरण ही केले.
या संगणक संचामुळे या शाळा डिजीटल होणार असून विद्यार्थी व शाळेला याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील शाळांना या सुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.






