नवी दिल्ली: टीम इंडियाने टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव करत मालिका ३-० अशी खिशात घातली. वनडेनंतर आता भारताने टी-२० मालिकेतही क्लीन स्वीप केला आहे. संघासाठी सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावले. तर व्यंकटेश अय्यरने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. कोलकातामध्ये वेस्ट इंडिजकडून खेळल्या गेलेल्या या सामन्यात निकोलस पूरनने ६१ धावांची चांगली खेळी केली.
कर्णधार किरॉन पोलार्ड अवघ्या ५ धावा करून बाद झाला. त्याचवेळी जेसन होल्डर २ धावा करून बाद झाला. या दोन्ही खेळाडूंना व्यंकटेश अय्यरने बाद केले. रोस्टन चेस १२ आणि सलामीवीर शाई होप वैयक्तिक ८ धावांवर बाद झाले. मेयर्सलाही केवळ ६ धावा करता आल्या.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८४ धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी केली. त्याने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरने १९ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. व्यंकटेशने या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारही मारले. सलामीवीर इशान किशनने ३४ आणि श्रेयस अय्यरने २५ धावांचे योगदान दिले.
टीम इंडियाकडून शानदार गोलंदाजी करताना दीपक चहरने २ बळी घेतले. त्याने १.५ षटकात १५ धावा दिल्या. यादरम्यान तो जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. व्यंकटेश अय्यरने २.१ षटकात २३ धावा देत २ बळी घेतले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या आवेश खानला एकही विकेट मिळाली नाही. तर हर्षल पटेलने ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात २२ धावा दिल्या. शार्दुल ठाकूरने ४ षटकात ३३ धावा देत २ बळी घेतले.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १६७ धावाच करू शकला. निकोलस पूरनने संघासाठी चांगली खेळी केली. त्याने ४७ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकारही लगावला. तर रोव्हमन पॉवेलने १४ चेंडूत २५ धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.