नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना जारी; 'हा' आहे हेल्पलाईन क्रमांक
राजधानी: पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान २०० लोकांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. दरम्यान आता भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
नेपाळमध्ये महापूरात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताच्या दूतावासाने काही सूचना जारी केल्या आहेत. तसेच एक हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी पूर आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत. तसेच दूतावास त्यांच्या सुरक्षित परतीसाठी व्यवस्था करत आहे.
नेपाळमधील भारतीय दूतावासाने ‘एक्स’वर पोस्ट केले, ”नेपाळमध्ये विक्रमी पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आमचे विचार प्रभावित झालेल्या सर्वांसोबत आहेत. दूतावासाला काही अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळाली आहे. दूतावास यापैकी काही गटांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करत आहे. अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दूतावास नेपाळी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे.”
नेपाळमधील भारतीय दूतावासाने मदतीसाठी इच्छुक लोकांसाठी आपत्कालीन क्रमांकही जारी केले आहेत. नेपाळमध्ये राहणारे भारतीय नागरिक ज्यांना मदतीची गरज आहे ते खालील आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधू शकतात (WhatsApp सह): +९७७ -९८५१ ३१६८०७ – [आपत्कालीन हेल्पलाइन] +९७७ -९८५११ १७०२१ , +९७७-९७४९ ३३ २९२
— IndiaInNepal (@IndiaInNepal) September 30, 2024
नेपाळचे शहरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून शोध आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, ‘नेपाळ पोलिसांनी बाधित भागात सुमारे तीन हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बचाव पथक तैनात केले आहे.’नेपाळ पोलिसांचे म्हणणे आहे की, सततच्या पावसामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत २०० लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी काही जण काठमांडू खोऱ्यात मरण पावले आहेत. पुरात ६० जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर डझनभर लोक बेपत्ता आहेत.