पिंपरी: मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूस भाजे गावाच्या हद्दीत दरड कोसळल्याची घटना शनिवारी (७ जून) सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्व बाजूस लोहगड गाव वसलेले असून, तेथील लोकसंख्या ६५० पेक्षा अधिक आहे. तर किल्ल्याच्या उत्तर बाजूस भाजे गाव आहे. मागील पंधरा दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले आहे.
याचा परिणाम म्हणून भाजे गावाच्या बाजूला किल्ल्याच्या उतारावर असलेला काही भाग शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोसळला. दरड कोसळताना मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिक सतर्क झाले आणि त्यांनी तातडीने ही माहिती महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली.
घटनेनंतर महसूल प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सध्या या ठिकाणी कोणतीही धोका निर्माण झालेला नसला, तरी पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
विक्रम देशमुख, तहसीलदार, मावळ, यांनी सांगितले, “लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूस भाजे गावाच्या हद्दीत दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, अशी सूचना आम्ही स्थानिकांना दिली आहे.”
रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका
रायगड जिल्ह्यात एक-दोन वर्षांत दरडी कोसळून जीवितहानी झाली आहे. त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून जिल्ह्यातील अनेक गावांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात १०३ गावांना दरडींचा धोका होता. तर भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर भूस्खलनाचा धोका असलेल्या आणखी २८९ गावांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण ३९२ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. राज्याच्च्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण अधिक आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षात झालेल्याभूस्खलनाच्या घटनांच्या पाश्वभूमीवर जिल्या प्रशासनाने दरडीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयारी केलेली दिसते. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा बोकादायक असणाऱ्या गावांना संपर्कासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाव वेळी या ठिकाणी हवामान पूर्वसूचना प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच आपत्ती काळात थेट संदेश प्रसारित होणार आहे. धोकादायक ठिकाणी सायरनची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रणालीसाठी इन्व्हर्टर बॅटरीही देण्यात आल्या आहेत.