bcci
Ajit Agarkar On Ruturaj Gaikwad : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा आणि गौतम गंभीरचे पहिलेच टीम सिलेक्शन चांगलेचा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. यासाठी काल टीम इंडिया श्रीलंकेला रवाना झाली. मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
बीसीसीआयवर टीका
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती. तसेच झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. यावरुन भारतीय क्रिकेट संघाच्या अनेक माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित करत बीसीसीआयवर टीका केली. या टीकेवर देखील अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली.
…म्हणून ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माची निवड नाही-
ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना चांगली कामगिरी करुनही संधी न मिळाल्याबद्दल अजित आगरकर म्हणाले, संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला वाईट वाटेल, पण आमचे काम फक्त 15 खेळाडूंना निवडण्याचे आहे. रिंकूकडेच बघा, टी-20 विश्वचषकापूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती. पण त्याला टी-20 संघात स्थान मिळवता आले नव्हते. आम्ही फक्त 15 खेळाडू निवडू शकतो, असं अजित आगरकर यांनी सांगितले.
बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशन, अंगावर टॅटू असेल तरच टीम इंडियात स्थान-
झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. यावरुन भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस. बद्रीनाथ बीसीसीआयवर चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. क्रिक डिबेट विथ बद्रीवर बोलताना म्हणाला की, काहीवेळा कामगिरीव्यतिरिक्त संघात स्थान मिळवण्यासाठी दुसरी प्रतिमा देखील आवश्यक असल्याचं आता वाटतंय. ऋतुराज गायकवाडसारख्या खेळाडूची टीम इंडियात निवड होत नाही. त्यामुळे संघात स्थान मिळवायचं असेल तर तुमचं बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर रिलेशन असणं, प्रसारमाध्यमांबरोबर तुम्हाला नीट संगनमत करता येणं आणि अंगावर टॅट्यू असणं गरजेचं आहे का?, असा सवाल ब्रदीनाथने उपस्थित केला. दरम्यान ऋतुराजने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये 7,77 आणि 49 धावा केल्या होत्या. त्याला शेवटच्या म्हणजेच पाचव्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आलेली नव्हती.