अहमदनगर : महाराष्ट्रासह देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) जगाला सांगत होते की भारतातील कोरोना गेला, पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू (Bachu kadu) यांनी केली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू हे अहमदनगरच्या दौऱ्यावर आले होते. अहमदनगरमध्ये प्रहार जनशक्तीच्या वतीने कोविड केअर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणींची समजून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावर बोलताना मोदींवर टीका केली.
देशात वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन मिळत नाही, इंजेक्शन मिळत नाहीत. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. उलट ते जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना हद्दपार झाला आहे. जर पंतप्रधान मोदींनी देशभरात योग्य नियोजन केले असते तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.