मुंबई : नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्वरित एक समिती स्थापन करून विभागाला सात दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. नाशिकच्या म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमात तीन दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी आश्रम संचालक हर्षल मोरेला (Harshal More) अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले असता पाच विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.
[read_also content=”एकही इंच जागा जाणार नाही, मराठी भाषिकांना निधी कमी पडू देणार नाही – शंभुराज देसाई https://www.navarashtra.com/maharashtra/not-an-inch-land-will-be-lost-marathi-speakers-will-not-be-allowed-to-lose-funds-shambhuraj-desai-349282.html”]
दरम्यान, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी एका वृत्तपत्रात, नाशिकच्या अनाथ आश्रमातील संचालकाने सहा अल्पवयीन मुलींचा लैगिंक छळ केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, याबाबतीत महिला व बालविकास विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या घटनेनंतर आरोपी हर्षल मोरेवर म्हसरुळ पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर आता हे प्रकरण थेट केंद्र शासनांपर्यत गेले असून, आदिवासी मुलींना न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.