भोर : भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरणही (Niradevghar Dam) शुक्रवारी (दि. ७) दुपारी १२ वाजता १०० टक्के भरले असून, धरणाच्या तीन दरवाजातून १४८२ क्युसेक, तर पॉवर हाऊसमधून (Power House) ७५० क्युसेक असे एकूण २२३३ क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाचे उपअभियंता चव्हाण, शाखा अभियंता परमानंद गोसावी, राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता दिगबंर डुबल, सर्जेराव लोखंडे, किसन चंदशिव, सुभाष यादव, संतोष कंक यांच्या हस्ते जलपूजन झाले.
वीजनिर्मिती केंद्र सुरु
११.९१ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणावरील वीजनिर्मिती केंद्र शुक्रवारपासून सुरु करण्यात आले असून, त्यासाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. वीजनिर्मिती केंद्रातून दररोज ६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरु झाली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत १८ दिवस भरले धरण
गेल्या वर्षी २४ ऑगस्टला नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले होते. यंदा ते १८ दिवस आधी म्हणजे ६ ऑगस्टला भरले. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला आणि भाटघर धरण क्षेत्रापेक्षा नीरा-देवघर धरण क्षेत्रात यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे धरण लवकर भरले.






