कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्याने सरासरी १०० गुंठ्यात ३५० टन म्हणजेच एकरी १४० टन ऊस उत्पादन घेतले आहे. या यशस्वी प्रयोगाची पाहणी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केली.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एकरी १०० टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या ऊसपिकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे, ऊस विकास विभागातील मंडल अधिकारी व शेती मदतनीस यांच्यामार्फत मार्गदर्शन व माहिती संकलित केली जाते. तसेच सहभागी शेतकर्यांना कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येतात. शेतकऱ्यांना माफक दरात जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कंपोस्ट खते पुरविली जातात. या योजनेत सहभागी झालेले शेतकरी संकेत मोरे यांनी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून, उत्कृष्ट नियोजनाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते, हा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक जे. डी. मोरे, संजय पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, माजी सरपंच कुमार कांबळे, सोसायटी संचालक पतंगराव मोरे, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव माळी, पशुपती सोसायटीचे संचालक धैर्यशील पवार, आनंदराव माळी, केदार शिंदे, अविनाश मोरे, पंकज पवार, जयसिंग कोळेकर, धोंडीराम जाधव, धनाजी मोरे, विकास मोरे, मंजित मोरे, सुरजित मोरे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील यांच्यासह शेतकरी सभासद व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
[blockquote content=”संकेत मोरे यांनी अत्याधुनिक पद्धतीने स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून घेतलेले हे ऊस उत्पादन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अन्य शेतकर्यांना प्रेरणा देणारे ठरेल.” pic=”” name=”- डॉ. सुरेश भोसले, चेअरमन कृष्णा कारखाना.”]
कृष्णा कारखान्याचे मोलाचे सहकार्य
स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून मी पाण्याची बचत केली. रासायनिक खतांचा योग्य वापर केला. कृष्णा कारखान्यामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कारखान्यात तयार होणारी जिवाणू खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कंम्पोस्ट खते यांचा वापर करण्यात आला; ज्यामुळे विक्रमी ऊस उत्पादन घेणे मला शक्य झाल्याचे संकेत मोरे यांनी सांगितले.