मसाज पार्लरच्या नावे सुरू होता देहव्यापार
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गुन्हे घडत आहेत. असे असताना आता नाशिकमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना चालवला जात असल्याचे समोर आले होते. पीडित मुलींकडून देहव्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या पार्लरवर गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच मुलींची सुटका करण्यात आली.
शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली असली तर, या व्यवसायात गुंतलेल्यांकडून अन्य मार्गाचा वापर करून चोरीछुप्या पद्धतीने देह व्यवसाय सुरूच असल्याच्या तक्रारी आहेत. अशाच प्रकार मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेट्रोझोनसमोर कमर्शिअल गाळ्यात ‘आरंभ स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यावरून पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदिप मिटके, पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने मेट्रोझोन समोरील गाळ्यावर अचानक छापा मारला असता, या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायासाठी कानपुर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यातून तसेच नाशिकमधील एक महिला अशा पाच पीडित मुली या ठिकाणी सापडल्या.
तसेच मसाज पार्लर चालविणारी खुशबू परेश सुराणा हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्यासाठी भाग पाडत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी खुशबू सुराणा हिच्याविरूद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुराणा हिच्या विरूद्ध यापूर्वीही पिटा व पोस्को कायद्याने गुन्हे दाखल आहेत.
पुण्यातही पोलिसांची धडक कारवाई
दुसरीकडे, पोलिसांकडून वेश्याव्यवसायावर अनेकदा कारवाई केली जाते. त्यातच पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर व विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धडक कारवाई केली आहे. बाणेर आणि विमानतळ परिसरात छापेमारीत एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली आहे.