पुणे : राजकीय वर्तुळामध्ये सध्या गुंडाच्या राजकीय पक्ष प्रमुखांसोबत होणाऱ्या भेटीगाठींची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याची भेट घेतली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या प्रकरणावरुन आता शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी सत्ताधारी शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार आहेत. असा घणाघात शरद कोळी यांनी केला.
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद कोळी म्हणाले, “एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार आहेत. त्यामुळे ते येत्या 2024 च्या निवडणूकीसाठी गुंडांची जमवाजमवी करत आहेत. दिवसाढवळ्या त्यांनी पुढच्या निवडणूकीचे स्वप्न पडू लागले आहेत. मतदारांना आता धमकावण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी हे हवशे, गवशे, नवशे गोळा करत आहेत. त्यांत नवल काही नाही कारण, त्यांच्या पाचवीला पुजलेलं काम आहे.” असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
सरकारवर निशाणा साधत शरद कोळी यांनी जहरी टीका केली. “पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या गुंडांवर का नाही कारवाई केली जात. गुंड गोळा होत आहेत हे उभा महाराष्ट्र बघत आहे. कारण मुळातच सरकारतच गुन्हेगार आहे. सरकारच गुन्हा करुन सत्तेमध्ये सामील झाले आहेत. सरकार कायद्याने सत्तेत बसलेलं नाही. सरकारच बेकायदेशीर आहे. त्यामुळे राज्यामध्ये गुन्हेगारीला वाव निर्माण झाला आहे. या गुन्हेगारांची सर्व सूत्रधार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाने खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः फिरत गावागावतले गल्लीतले भुरटे गुन्हेगार गोळा केले आहेत.” असे गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदें व त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेवर केले आहेत.
भाजप नेते नितेश राणेंवर टीकास्त्र
नितेश राणे या हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिलं जात असल्याचा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर शरद कोळी यांनी कोण नितेश राणे याचा प्रतिसवाल केला. “नारायण राणेंच्या गाबड्याला काही अक्कल आहे का कोणतं हिंदूत्व त्याला कळतं. राज्यपाल धोतरवाला कोश्यारी काही काही बोलला त्यावेळेस कुठे गेलं होतं त्याचा हिंदुत्व. समुद्रात भिजत घातलं होतं का? फक्त 2024 च्या निवडणूकीसाठी हिंदुत्वाचा बुरखा घालून हे गल्लोगल्ली फिरत आहेत.” असा घणाघात ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केला.