नवी मुंबई (सिद्धेश प्रधान) : नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai AirPort) स्व. दि. बा. पाटील (D.B.Patil) यांचे नाव द्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM. Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी प्रकल्पग्रस्तांसोबत झालेल्या बैठकीत घेतली. या आश्वासनाने भूमिपुत्रांमध्ये आनंद पसरला असला तरी अधिसूचना निघत नाही तोपर्यंत सावध पवित्रा ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर भूमिपुत्रांनी घेतलेला दिसत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या नरमलेल्या भूमिकेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांच्या नावाचा हट्ट धरून शिवसेनेने (Shivsena) भूमिपुत्रांची नाराजी ओढवून घेतली आहे. एकीकडे भूमिपुत्रांची नाराजी आणि एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामधील पालिका निवडणुकांत फटका बसू नये यासाठी तूर्तास दि. बा. पाटील यांच्या नामकरणासाठी होकार दर्शवीत मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल (Damage Control) करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रायगड आणि नवी मुंबई प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत बैठकीत प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. माझे आजोबा आणि वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत नावासाठी कधी ही आग्रह केला नाही. ज्यावेळी विमानतळाला नाव (Naming) द्यायचा विषय आला त्यावेळी मी सूचना केली होती की; जर नावाबाबत वाद असेल तर तो विषय. परंतु, तत्कालिन मंत्र्यांनी मला सांगीतले की साहेब मी जबाबदारी घेतो आणि सदर विषय मार्गी लावतो. तुम्ही काळजी करु नका, असे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना नामकरणाच्या वादाला जबाबदार ठरवले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने पुन्हा शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका म्हणजे राजकीय अपरिहार्यता समजली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटताना दिसत आहेत. त्यात राज्यात आगामी कालावधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. या निवडणुकांना म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकांचे महत्व प्राप्त झाले आहे. त्यात सर्व पक्षियांचा डोळा हा मुंबईसह एमएमआरमधील सर्व पालिकांवर आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत तुल्यबळ लढाई होणार आहे. तर दुसरीकडे आजतागायत एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला ठाणे, पालघरमधील पालिकांची चिंता करू दिलेली नाही. मात्र, सध्या चित्र वेगळे असून मुंबई बाहेरील शिवसैनिकांमध्ये आनंद दिघे यांच्यानंतर मानाचे स्थान मिळवलेले एकनाथ शिंदे यांनीच मातोश्रीविरोधात बंड पुकारलेले आहे. त्यामुळे मुंबई हातातून जाण्याची भीती असतानाच शिंदे यांचे वर्चस्व असलेली नवी मुंबईसह ठाणे, पालघर ही शहरे देखील हातातून जातात की काय; अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शिंदे गट वरचढ झालेला असताना या क्षेत्रातील आगरी-कोळी भूमिपुत्र देखील दि. बा. पाटील यांच्या नामकरणासाठी शिवसेनेपासून दुरावलेला आहे.
उद्धव ठाकरे अद्याप बंडखोर आमदारांना परतीचे आवाहन करत आहेत. त्याची शक्यता कमी असल्याने निदान आगरी-कोळी समाजाला तरी निदान आपलेसे करावे ही सेना समर्थक भूमीपूत्रांनी ठाकरे यांना दिलेली कल्पना तूर्तास लागू पडली आहे. त्यातूनच जमलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत उद्धव ठाकरेदेखील विमानतळाच्या नामकरणासाठी दि. बांच्या नावास सकारात्मकता दाखवत तूर्तास डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदे तोंडघशी?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सांगितले. त्यात याआधीच शिवसेनेला विरोध म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीला भाजपाने पाठिंबा देत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन हायजॅक केल्याचे दिसून येते. त्यात बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रही असलेला शिंदे गट भाजपसोबत जाऊ इच्छित आहे. सत्तेचे लोणी खाताना विमानतळाबाबत बंडखोरी करत बाळासाहेबांचे नाव घेणाऱ्या शिंदे गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी चतुराईने आपल्यावरचे बालंट शिंदेंविरोधात अंगावर टाकले आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यास शिंदे गट आणि भाजपाला नामकरणबाबतचा शिंदे गटावरील आरोपांचा तिढा सोडवावा लागणार आहे.
अधिवेशनात अधिकृत घोषणा होणे गरजेचे
भूमिपुत्रांच्या आंदोलनामुळे हे यश मिळालेले आहे. त्यात अद्यापाही प्रशासकीय बाबी महत्वाच्या आहेत. त्यांची पूर्तता होणे आवश्यक आहे. भाजपचा आधीच दी. बांच्या नावाला पाठिंबा होता. आता सेनेने त्यास होकार दिला आहे. मात्र, येत्या अधिवेशनात याबाबत अधिकृत घोषणा होणे गरजेचे आहे, असे मत आगरी कोळी युथ फाउंडेशन अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले.
हा अस्मितेचा लढा- संदीप नाईक
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा लढा भूमिपुत्रांनी गेली दोन-तीन वर्षे सातत्याने सुरू ठेवला आहे. त्यांच्यासाठी हा अस्मितेचा लढा आहे. आज ठराविक प्रतिनिधींच्या बैठकीत नामकरणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे समजते. परंतु, त्यामध्ये ठोस कृती दिसत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव प्रत्यक्षात मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे, असे माजी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले.
भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय- मंदा म्हात्रे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलेली सकरात्मकता हा भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपची पहिल्यापासून भूमिका आहे की दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले पाहिजे. जेव्हा विमानात दि. बा. पाटील विमानतळाची घोषणा होईल तो खरा आनंद असेल. नामकरणाची अधिसूचना निघणे महत्वाचे आहे, असे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मी जर ठरवले असते तर कधीही मी सभागृहात विषय घेऊन मंजूर करुन नामकरण जबरदस्तीने केले असते. पण मी जाणिवपुर्वक हा विषय आजतागयत सभागृहात घेतला नाही. नामांतरण विषय फक्त सिडको बैठकीत मंजूर झाला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नावासाठी मी मराठी माणसात फूट पाडणार नाही, विशेषत: आगरी-कोळी समाजाचे शिवसेना पक्षावर खूप ऋण आहेत. त्यामुळे यापुढ़ आपण एकीने दि. बा. पाटील साहेबांच्या नावासाठी आग्रही राहु, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.