सोलापूर : देशभरात सध्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२२ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत जिल्ह्यातील ७५ हजार विद्यार्थ्यांचे एकाच वेळी राष्ट्रगीत म्हणण्याचे आयोजित करण्यात आल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रांत वेगवेगळे कार्यक्रम वर्षभर राबवले जात आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही यानिमित्ताने कार्यक्रम सुरू आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील १ हजार २८ ग्रामपंचातीत होईल. इयत्ता पाचवीच्या पुढील विद्यार्थ्यांच्या यात समावेश असणार आहे. हा कार्यक्रम सोशल मीडियावर लाईव्ह करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
शाळेत रोजच राष्ट्रगीत होते. मात्र, गावाची संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात ग्रामसेवक, आरोग्य सहायक, तलाठी, कृषी सहायक त्या गावातील जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनाही सहभागी होण्याचे आवाहन स्वामी यांनी केले आहे.