फोटो सौजन्य - Social Media
काळी व खोल गेलेली डोळ्यांची कडा इंग्रजीत डार्क सर्कल्स म्हणून ओळखली जाते. साधारणपणे ही समस्या आरोग्याच्या दृष्टीने मानसिक किंवा शारीरिक नुकसान पोहोचवत नाही. पण, या त्रासामुळे चेहर्याचा देखावा पूर्णपणे बिघडू शकतो. कल्पना करा, चेहर्याच्या रंगाच्या तुलनेत डोळ्यांभोवतीचा भाग अधिक काळसर असेल, तर आपण गोंडस न दिसता थोडेसे पांड्यासारखे मजेदार दिसू! त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की, या स्थितीपासून बचाव कसा करायचा?
डार्क सर्कल्सपासून कसा वाचाल?
डार्क सर्कल्सवर उपाय म्हटले की आपल्याला सर्वात आधी ८०० रुपयांच्या क्रीम्स किंवा इतर महागडी उत्पादने आठवतात. पण केवळ डोळ्यांखालील त्वचेसाठी एवढा खर्च करणे योग्य आहे का? बर्याच जणांचा विचार असा असतो की ही समस्या फार गंभीर नाही, त्यामुळे लक्ष देण्याची गरज नाही. काहीजण तर तात्पुरत्या मेकअप उपायांवरच अवलंबून राहतात. पण जर तुम्हाला या समस्येपासून कायमचा बचाव करायचा असेल, तर काही सोपे आणि नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुधांशु राय यांनी सोशल मीडियावर डार्क सर्कल्स टाळण्यासाठी काही कराव्या आणि टाळाव्या अशा सवयींबाबत सांगितले आहे. हे उपाय केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सशिवाय त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
झोपेची गुणवत्ता सुधारावी
डार्क सर्कल्स टाळण्यासाठी पुरेशी व चांगली झोप महत्त्वाची आहे. दररोज किमान ८ तास झोप घेणे गरजेचे आहे. शक्यतो रात्री १०:३० किंवा ११ वाजेपर्यंत झोपायला जावे.
खाण्याच्या वेळा पाळाव्यात
आपण काय आणि कोणत्या वेळी खातो, याचा देखील डार्क सर्कल्सवर परिणाम होतो. दुपारी २ नंतर जास्त मीठ असलेले स्नॅक्स किंवा कॅफिनयुक्त पेये टाळावीत.
डोळ्यांना थंडावा द्यावा
दिवसभराच्या कामानंतर रात्री डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी थंड ग्रीन टी बॅग्स किंवा गुलाबपाण्याचे पॅड्स डोळ्यांवर ठेवावेत. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि डार्क सर्कल्स होण्याची शक्यता घटते.
आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करावा
रोज भिजवलेले बदाम, संत्री, तसेच पालक व काळे हरभरे यांसारख्या आयरनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. हे घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि त्वचेचा आरोग्यदायी तेज राखतात.