दिवाळी म्हणजे आनंदाच आणि उत्साहाचं वातावरण असतं. भारतात सणांची तशी काहीच कमी नाही, विविध जातीधर्मातील सण साजरे होतात मात्र एक सण असा आहे जो देशातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे साजरी करतात तो म्हणजे दिवाळीचा सण. केवळ देशातच नाही या मायदेशाशी नाळ जोडलेले अनेक परदेशात गेलेले चाकरमानी त्या त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. मात्र भारतात असं एक ठिकाण नव्हे तर राज्य आहे जे दिवाळी साजरी करत नाही.
दिवाळी म्हणजे रोषणाईचा सण मात्र केरळ हे असं राज्य आहे जिथे दिवाळी साजरी होत नाही. जरा विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याचं पौराणिक आणि शास्त्रीय अशी दोन कारणं आहेत. पुराणकथेनुसार, असं म्हटलं जातं की, महाबली नावाचा एक असूरांचा राजा होता. हा असूर कुळातील असला तरी, त्याने प्रजेला कधीही त्रास दिला नाही. इतर असूरांसारखी ओरबाडून घेण्याची राक्षसी वृत्ती त्याची नव्हती. असुर कुळातील हा राजा दानशूर होता. या राजाच्या राज्यात प्रजा सुरक्षित असायची. असूर असला तरी महाबली विष्णूभक्त होता. त्याचा चांगुलपणा हीच त्याची सर्वात मोठी शक्ती होती. प्राचीन पुराणांमध्ये उल्लेखलेला एक पराक्रमी, दयाळू आणि धर्मनिष्ठ असुरराजा होता.महाबलीच्या राज्यात सर्वजण सुखी आणि समृद्ध होते. कुणालाही दुःख, किंवा अन्याय होत नव्हता. केरळात दिवाळी साजरी न करण्याचं कारण म्हणजे राजा महाबली ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि त्याच्यावरील प्रेमाखातर केरळात दिवाळी साजरी केली जात नाही.
भगवान विष्णूंनी महाबलीला सुतळ लोकाचे अधिपत्य दिले आणि दरवर्षी पृथ्वीवर आपल्या प्रजेला भेट देण्याचा आशीर्वाद दिला. म्हणून केरळमध्ये आजही ओणम हा सण महाबलीच्या आगमनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.महाबली असुराचा संदेश असा आहे की, खरा धर्म वंशात नसतो तर कर्मात असतो. दान, सत्य आणि विनय हेच खरे दैवी गुण आहेत. महाबली हा असुर असूनही आज “महान राजा” म्हणून पूजला जातो. याचकारणाने दिवाळी साजरी न करता ओणम साजरा केला जातो.
केरळात दिवाळी साजरी न करण्याचं शास्त्रीय कारण म्हणजे, तेथील भौगोलिक वातावरण. केरळ हा भारताच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर, म्हणजेच अरबी समुद्राच्या काठावर आहे.या प्रदेशात मान्सून पावसाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. उत्तरेच्या राज्यात तसं होत नाही. शरद ऋतू पावसाळा संपून थंडीला सुरुवात झालेली असते, त्य़ामुळे थंडीत ऊब मिळावी म्हणून उत्तरेच्या राज्यात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे. मात्र दाक्षिणात्य राज्यात तसं होत नाही. केरळमध्ये शरद ऋूतूत देखील पावसाळा काही अंशी असतो. त्यामुळे केरळात पणत्या लावून दिवाळी साजरी केली जात नाही.