वाईटावर चांगल्याचा विजय किंवा अंधारात मिळणारा प्रकाश, दिव्यांची आरास, कंदील, फराळ आणि दारात रांगोळी म्हटलं की आठवतं ते दिवाळीचा सण. थंडीच्या दिवसात येणाऱ्या या सणाला आयुर्वेदात जसं महत्व आहे तसंच त्याची पौराणिक बाजू देखील आहे. प्रत्येक सणाला काही ना काही पौराणिक बाजू आहे तशीच बाजू दिवाळीच्या सणाला देखील आहे. तुम्हाला माहितेय का दिवाळी सणाच्या देखील काही आख्यायिका सांगितल्या जातात. कोणत्या आहेत या पौराणिक कथा चला तर मग जाणून घेऊयात…
असं म्हणतात की, दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. सहसा या दिवसात शेतीची कामं देखील पूर्णत्वास आलेली असतात. दिवाळी सणाच्या काही पौराणिक कथा देखील आहेत. यातीलच एक कथा म्हणजे समुद्रमंथनाची. समुद्रमंथनातून अनेक रत्न मिळाली त्याची कथा सर्वांनाच माहिती आहे. मात्र देवी लक्ष्मीची निर्मितीदेखील याच समुद्रमंथनातून झाली असं म्हटलं जातं.याच समुद्रमंथनातून माता लक्ष्मी अवतरली आणि विष्णूंनी तिला पत्नि म्हणून स्विकारलं म्हणूनच हा शुभ दिन म्हणून लक्ष्मी पृथ्वीवर अवतरली तो दिवस दिवाळी म्हणून साजरा करतात आणि दिवाळीत लक्ष्मीपूजन देखील केलं जातं. याच बरोबर आणखी एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे पांडवांची.
कौरवांबरोबरच्या सारीपाटात पांडव हरले आणि त्यांना वनवास भोगावा लागला. ज्यावेळी पांडव वनवास संपवून पुन्हा स्वगृही परतले तो दिवस आनंदाचा होता आणि याच कारणासाठी प्रजेने एकत्र येत पांडवांच्या येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावले, रोषणाई आणि गोडाधोडासाठी फराळ घराघरांत तयार केला गेला, अशी देखील आख्यायिका सांगितली जाते. या झाल्या पौैराणिक कथा. मात्र दिवाळी सणाचं महत्व शास्त्रीयदृष्ट्या देखील तितकंच अर्थपूर्ण आहे.
दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाने केलेली मात. शरद ऋतूत येणारा पहिला सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत पणत्या लावण्याचं खरं कारण म्हणजे दर्श अमावस्या. खरंतर अमावस्येला नकारात्मक अर्थाने घेतलं जातं मात्र याच दिवशी लक्ष्मी पूजन देखील केलं जातं त्यामुळे अमावस्या म्हणजे वाईट काही अशी धारणा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे. अमावस्य़ेला चंद्राचा प्रकाश दिसत नाही. मिट्ट काळोख असल्याकारणाने दिवाळीत पणत्या पेटवल्या जातात. त्याचशिवाय या दिवसात थंडी जास्त असते. दिव्यांच्या उष्णतेमुळे वातावणात उब राहते.आपले सण आणि आयुर्वेददेखील परस्परांशी सलग्न आहेत.
थंडीच्या दिवसात शरीराला बाहेरील कोरड्या वातावरणाचा त्रास होतो. थंडीमुळे पाणी कमी प्यायलं जातं त्यामुळे त्वचेला कोरडेपणा जाणवू नये यासाठी स्निग्ध पदार्थ म्हणजेच तुपकट असे लाडू करंजी शंकपाळ्या असा फाराळ केला जातो. त्यामुळे शरीराला नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि शरीराला वातावरणातील बदलांना जुळवून घेण्यास पुरेशी उष्णता मिळेल, हाच या मागचा खरा उद्देश आहे.