“साधु संत येती घरा तोची दिवळी दसरा” अशी ओळ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील आहे. यावरुन हे सिद्ध होतं की दिवाळीचा सण हा अनेक वर्ष जुना आहे. संत तुकाराम महाराजअसो किंवा त्यांच्या पुढील पिढी म्हणजे छत्रपती शिवजी महाराज असो या काळात मुघल, डच यांनी अनोनात रयतेवर अमानुष अत्याचार केले. मात्र असं असलं तरी छत्रपती शिवरायांच्या काळात रयतेला सणवार साजरं करण्यासाठी परकीय सत्तांकडून अभय मिळालं होतं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दिवाळी फक्त सणाचा एक भाग नव्हता तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या आनंदाचा आणि पराक्रमाचा उत्सव यावेळी केला जात असे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दिवाळीचा सण राजमहल, गड-किल्ले आणि जनतेच्या घरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाई. या सणात धार्मिकता, कर्तव्य आणि राष्ट्रप्रेम दिसून येत असे. शिवराय स्वतः अत्यंत धार्मिक व संस्कारशील होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि फटाक्यांचा उत्सव साजरा होत असे.दिवाळीच्या आधी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी गडावर आणि राजवाड्यात विशेष सजावट केली जाई. दिव्यांच्या रांगा, सुगंधी धूप, पुष्पमाळा आणि हळद-कुंकूने सजलेले दरबार हे दिवाळीचे वैशिष्ट्य होते. महाराज स्वतः सर्वांना शुभेच्छा देत आणि सैनिकांनाही बक्षिसं वाटायचे.
दिवाळी म्हणजे आनंद आणि उत्साहाचं वातावरण. खरंंतर याचं शास्त्रीय कारण पाहायला गेलं तर शरद ऋतूत शेतीची कामं झालेली असतात. पीक आलेलं असतं. धन धान्य वाढीस लागलेलं असतं. त्यामुळे बळीराजाच्या आनंदाला यादिवसात पारवार राहत नाही. दिवाळीचा सण हा खास शेतकरी वर्गात जोमाने साजरा केला जातो. शिवरायांच्या स्वराज्यात देखील सैन्यात जास्त करुन शेतकरी कुळातील मावळे असायचे. त्यामुळे या सणाला पारंपरिक, धार्मिक आणि भौगोलिक तसंच राजकीयदृष्ट्या देखील मोठं महत्व होतं.
शिवरायांच्या काळात राजदरबारात दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजनासाठी राखीव असे. महाराज स्वतः लक्ष्मी पूजन करत, सोबत राणी, कुटुंबातील सदस्य आणि दरबारातील मानकरी उपस्थित असत. लक्ष्मीदेवीच्या मूर्तीसमोर सुवर्ण नाणी, शस्त्रं आणि धान्य ठेवून पूजा केली जाई.त्यानंतर महाराज सैनिकांना, शेतकऱ्यांना आणि प्रजेला सन्मानचिन्हं आणि भेटवस्तू देत असत. हे दिवस पराक्रमी योद्ध्यांच्या गौरवाचा आणि जनकल्याणाचा उत्सव मानला जाई.गावागावात लोक घरं स्वच्छ करून, गेरू आणि चुना लावून सजवत. महिला वर्ग रांगोळ्या काढत आणि तेलाचे दिवे लावत असे. आनंदाचं वातावरण असलेल्या गोडधोड आणि फराळाची मेजवानी असे तर पुरुषवर्ग एकत्र येऊन गाणी, पोवाडे आणि पराक्रमाच्या कथा सांगत असायचे.
शिवाजी महाराजांच्या काळातील एक खास परंपरा म्हणजे शस्त्रपूजन. या दिवशी तलवारी, भाले, ढाली आणि तोफा यांचं पूजन केलं जाई. यामागे उद्देश होता “शौर्य आणि धर्म यांची काच कधीच कोणत्या मावळ्याने सोडू नये. ” महाराज मानत की, शस्त्र हे फक्त युद्धाचं साधन नाही, तर ते स्वराज्य आणि न्यायाचं रक्षण करणारी देवता आहे.दिवाळीच्या काळात महाराज रयत, शेतकरी, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना धान्य, वस्त्र, आणि कधी कधी नाणी किंवा जनावरं अशी भेट देत असत. हे भेटवस्तू स्वरूपात असायचं, पण त्यामागे दयाळू शासन आणि सामाजिक समता हा भाव होता. सैनिकांना नवे शस्त्र, वस्त्र आणि आर्थिक बक्षिसं मिळत असे. शेतकऱ्यांना बी-बियाणं, जनावरं किंवा करमाफी दिली जाई.
गरीब रयतेला वस्त्रं, धान्य आणि गोडधोड पदार्थ वाटले जायचे.शिवाजी महाराजांसाठी दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा सण नव्हता, तर रयतेच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पेटवण्याची संधी होती. त्यामुळे दिवाळीच्या काळात करसवलती, बाजारातील दर नियंत्रण आणि अन्नधान्य पुरवठा सुनिश्चित केला जात असे.
कधीकधी महाराज किल्ल्यावरील साठ्यातून धान्य वाटप करण्याचा आदेश देत, जेणेकरून कोणतंही घर दिवाळीत अंधारात राहू नये, यासाठी महाराज स्वत: जातीनं याकडे लक्ष देत असायचे.