
झोपेतून उठणे ही खुप आव्हानात्मक गोष्ट असते. पहाटेची ती साखरझोप अनेकांना प्रिय असते. पण त्यातच अलार्म वाजला सगळा मूड जातो. अलार्म न लावता जाग येणं ही तर अनेकांसाठी अतिशय अवघड गोष्ट असते. रात्री उशीरा झोपणे, विविध गोष्टींचा मानसिक ताण, सततच्या आरोग्याच्या तक्रारी, मोबाइलचे अतिव्यसन यामुळे रात्री लवकर झोप येत नाही आणि मग सकाळी काही केल्या जाग येत नाही. मात्र असे झाले की आपली प्रचंड चिडचिड होते, कारण आपोआप मग दिवसाची पुढची सगळी कामे लांबत जातात. घरातली कामे, ऑफीस, मिटींग्ज त्यात लागणारी ट्रॅफीक आणि इतर अनेक गोष्टींचे नियोजन बिघडते.
सकाळचा आहार जास्त असला तरी चालतो मात्र रात्री झोपताना हलका आहार घ्यायला हवा. रात्री हलका आहार घेतला आणि लवकर खाल्ले तर अन्न लवकर पचते आणि शांत, गाढ झोप लागायला त्याची चांगली मदत होते. हलका आहार घेतला तर शरीर तो लवकर पचवते आणि शरीराला ताण येत नाही. त्यामुळे नकळत आपण वेळेत उठण्यास मदत होते.
सध्य़ा आपली असंख्य कामे ही उपकरन अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या हातात सतत मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट असे काही ना काही असतेच. मात्र आपण तंत्रज्ञानाच्या इतके आहारी जातो की आपल्याला कित्येक गोष्टी लक्षातही येत नाहीत. अनेकदा या उपकरणांमुळे आपली झोप उडते आणि मग आपल्याला सकाळी झोप आवरता आवरत नाही.