
फॉलिक ॲसिड केवळ महिलांसाठीच नाही; तर पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक, जाणून घ्या सविस्तर
Male Fertility Tips: गर्भधारणेचे नियोजन करताना महिलांच्या आहाराकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते; मात्र पुरुषांचे आरोग्यही गर्भधारणेसाठी तितकेच महत्त्वाचे असते. शुक्राणूंची निर्मिती आणि त्यांची गुणवत्ता चांगली रहावी तसेच शरीराला आवश्यक पोषक घटक मिळावे यासाठी फोलेट हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे बाबा होण्याचे नियोजन करणाऱ्या पुरुषांनीही आपल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतेच, असे नाही. त्यामुळे या गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. याविषयी डॉ. विशेषा यादव वंध्यत्व निवारण तज्ज्ञ,नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, ठाणे, मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
Health Update: अतिउष्णतेमुळे गर्भवतींना गंभीर धोका! मुदतपूर्व प्रसूती झाल्यास गर्भातच मृत्यूची भीती
फोलेट हे ‘व्हिटॅमिन बी ९’चे नैसर्गिक स्वरूप असून हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, वाटाणे, लिंबूवर्गीय फळे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध अशा तृणधान्यांमधून मिळते. फॉलिक ॲसिड हे याच जीवनसत्त्वाचे पूरक स्वरूप आहे. शरीरातील पेशींची निर्मिती आणि डीएनए तयार होण्यासाठी फोलेट आवश्यक असते.निरोगी शुक्राणूंच्या निर्मितीसाठी तसेच त्यांच्या आनुवंशिक घटकांचे संरक्षणाच्या दृष्टीने फोलेट अतिशय गरजेचे आहे.
शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी शरीरात पेशींची योग्य वाढ आणि डीएनएची निर्मिती होणे आवश्यक असते. या प्रक्रियेत फोलेट या जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे. शरीरात फोलेटची कमतरता असल्यास शुक्राणूंच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि आकारमान यांचा फोलेटच्या पातळीशी काही संबंध आहे का, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.
शुक्राणूंमधील डीएनएची गुणवत्ता ही देखील पुरुषांच्या प्रजननक्षमतेसाठी महत्त्वाची असते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण आणि काही पोषक घटकांची कमतरता यामुळे शुक्राणूंमधील आनुवंशिक घटकांचे नुकसान होऊ शकते. डीएनएच्या निर्मितीसाठी फोलेट आवश्यक असल्याने शुक्राणूंच्या आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचा अभ्यास केला जात आहे. मात्र, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते किंवा गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते, याबाबत अद्याप ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वावर फॉलिक ॲसिड हा खात्रीशीर उपाय समजू नये.
पालकत्वाचे नियोजन करणाऱ्या पुरुषांनी संतुलित आणि पोषक आहाराच्या सेवनावर भर द्यावा. हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्ये, वाटाणे, संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे आणि फोलेटयुक्त धान्यांचा आहारात समावेश करावा. यासोबत झिंक, व्हिटॅमिन बी १२ आणि शरीराला आवश्यक असलेले इतर पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळणेही महत्त्वाचे आहे.
फोलेटची कमतरता आढळल्यास, आहारातून पुरेसे पोषण मिळत नसल्यास किंवा काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये डॉक्टर फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देऊ शकतात. मात्र, प्रत्येक पुरुषाने गर्भधारणेचे नियोजन करताना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे आवश्यक असेलच असे नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त मात्रेत या गोळ्या घेणे टाळावे. फॉलिक ॲसिडचे अतिप्रमाणाने बऱ्याचदा व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे निदानास विलंब होण्याची शक्यता असते.
शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ एका जीवनसत्त्वावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, धुम्रपान आणि मद्यपानाये सेवन टाळावे. दीर्घकाळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यास पुरुषांनीही प्रजननक्षमतेची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये वीर्याची तपासणी आणि आवश्यकतेनुसार इतर वैद्यकीय तपासण्यांचा समावेश असू शकतो.
फोलेट हे पुरुषांच्या शरीरात डीएनएची निर्मिती आणि पेशींच्या योग्य विकासासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व आहे. शुक्राणूंच्या निर्मितीमध्येही त्याची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या पुरुषांनी संतुलित आहारातून आवश्यक पोषक घटक मिळतील याकडे लक्ष द्यावे. मात्र, फॉलिक ॲसिडच्या पूरक गोळ्या घेतल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारेलच, असे नाही. आहारातून पुरेसे पोषण मिळवणे, निरोगी जीवनशैली राखणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
एकूणच, फोलेट हे केवळ महिलांसाठी महत्त्वाचे नसून पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही आवश्यक आहे. गर्भधारणेचे नियोजन करताना जोडीदारांनी आपल्या आहाराकडे आणि आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य पोषण, निरोगी जीवनशैली आणि योग्य वैद्यकीय सल्ला यांमुळे प्रजनन आरोग्याची योग्य काळजी घेता येऊ शकते.
Ans: नाही. फॉलिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन B9 हे पुरुष आणि महिला दोघांसाठीही आवश्यक पोषक तत्त्व आहे. पुरुषांच्या प्रजनन आरोग्यासाठीही त्याची महत्त्वाची भूमिका असते.
Ans: फॉलिक ॲसिड शरीरातील पेशींची निर्मिती आणि DNA तयार होण्याच्या प्रक्रियेत मदत करते. शुक्राणूंच्या निर्मिती आणि आरोग्यासाठीही हे पोषक तत्त्व महत्त्वाचे आहे.
Ans: फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, रक्तक्षय आणि काही वेळा पेशींच्या सामान्य कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.