सणवार असो किंवा घरातील कोणतेही शुभकार्य मेहंदी काढण्य़ाची परंपरा खूप जुनी आहे. भारताव्यतिरिक्त काही प्रमाणात का असेना पण बऱ्याच आशियाई देशात मेहंदी काढण्याला पसंती दिली जाते. विशेषत: भारतीय संस्कृतीत स्त्रिया मेहंदी काढण्याला जास्त प्रधान्य देतात. मेहंदीमुळे सौंदर्य खुलून दिसतं मात्र केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने देखील मेहंदी लावण्याचे असंख्य फायदे आहेत, याबाबत आयुर्वेदात काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात..
आयुर्वेदात अनेक असे घटक आहेत जे फक्त नैसर्गिकरित्या सौंदर्य वाढवत नाही तर तुमचं आरोग्य निरोगी राखण्यासाठी देखील मदत करतात. त्यातील एक म्हणजे मेहंदी. आयुर्वेदात सांगितलं जातं की, मेहंदीचा मुळ गुणधर्म हा थंड आहे. अनेकदा आरोग्यतज्ज्ञदेखील मेहंदीचे फायदे सांगतात. बऱ्य़ाच जणांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असतो. याची काऱण वेगवेगळी असली तरी, शरीरातील अतिरिक्त उष्णतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. याचं समस्येवर असलेला उपाय म्हणजे मेहंदी.
मेहंदी काढल्य़ाने ती शरीरातील उष्णता खेचून घेते. मेहंदीमध्ये नीलगिरीचा देखील समावेश असतो. नीलगिरीचा अर्क हा जंतूनाशक असल्याने त्वचाविकार किंवा त्यासंबंधीतले आजार कमी होण्यास मदत होते. इतकंच नाही तर भाजणं, खरचटणं किंवा कोणतीही जखम झाल्यास मेहंदीचा लेप लावल्याने आराम पडतो. अनेक जण सहसा उन्हाळ्याच्या दिवसात हाताला मेहंदी लावतता. याचं कारण म्हणजे बाहेरील वातावरणामुळे शरीरातील वाढणारी उष्णता काही प्रमाणात कमी होते. फक्त शरीराला थंडावा देणं हा एवढाचं मेहंदीचा गुणधर्म आहे का ? तर नाही.
शारीरिक त्रासाप्रमाणेच मानसिक ताण तणाव असल्यास यावर मेहंदी गुणकारी आहे. मेहंदी लावल्याने शरीरात चांगल्या हार्मोन्सची वाढ होते. मेंदूतील अतिविचार थांबतात. सध्याचं वातावरण हे जास्तीत जास्त प्रदुषणाने भरलेलं आहे. फक्त मानसिक तणाव किंवा शरीरातील कोणत्याही व्हिटामीन्सच्या अभावाने ज्याप्रमाणे केसगळती होते त्याचप्रमाणे प्रदुषित वातावरणामुळे देखील केस मोठ्या प्रमाणात खराब होतात. यावर आयुर्वेदातील रामबाण उपाय म्हणजे मेहंदी.
कमकुवत आणि पातळ केसांची समस्या अनेकांना भेडसावते. अशांनी केसांवर मेंदी लावली तर केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील, असं आयुर्वेद सांगतं. मेहंदी हा एक आयुर्वेदिक आणि नैसर्गिक रंग आहे जो तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या रंग देतो. महागडे कॉस्मेटिक रंग तुमच्या टाळूला नुकसान पोहोचवू शकतात आणि त्वचेच्या समस्या वाढवू शकतात, म्हणून जर तुम्ही तुमच्या केसांना मेहंदी लावली तर तुमचे केस नैसर्गिकरित्या रंगलेले राहतील.
मेहंदी लावतानाही ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर तुमच्या शरीरात कोरडेपणा असेल तर केसांना आणि हातांना मेहंदी लावताना त्यात थोडेसे खोबरेल तेल वापरणं फायद्याचं ठरतं. नारळाचे तेल त्वचेतील खाज कमी करेल आणि कोरडेपणा दूर करतं असं आयुर्वेद सांगतं.