
फोटो सौजन्य - Social Media
भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे मसाले केवळ जेवणाची चव वाढवत नाहीत, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरतात. आयुर्वेदानुसार अनेक मसाल्यांमध्ये पचन सुधारण्याची, शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याची, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याची तसेच वजन कमी करण्याची क्षमता असते. योग्य पद्धतीने आणि नियमित वापर केल्यास हे मसाले पोटावरील हट्टी चरबी कमी करण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे, जर मसाल्यांच्या सेवनासोबत साखर, मैदा आणि जंक फूड कमी केले, तर वजन घटण्याचा परिणाम अधिक लवकर दिसून येतो. घरच्या घरी सहज उपलब्ध असलेले काही मसाले आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा, हे जाणून घेणे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकते.
जिरे पचनसंस्थेसाठी अत्यंत लाभदायक मानले जातात. ते शरीरातील मेटाबॉलिजम वाढवतात, त्यामुळे अन्न लवकर पचते आणि अतिरिक्त चरबी साचत नाही. पोट फुगणे, गॅस यासारख्या समस्या कमी करण्यातही जिरे उपयोगी ठरतात.सेवन कसे करावे: एक चमचा जिरे रात्री एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून कोमट झाल्यावर गाळून प्या. यामुळे कंबर व पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.
दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाणे टळते. विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दालचिनी प्रभावी मानली जाते. सेवन कसे करावे: सकाळी कोमट पाण्यात किंवा चहात एक चिमूट दालचिनी पावडर मिसळून घ्या. मधासोबत घेतल्यास अधिक फायदा होतो.
मेथी दाणे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. ते इन्सुलिन सक्रिय करतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सूज आणि शरीरातील जडपणाही कमी होतो. सेवन कसे करावे: रात्री भिजवलेले मेथी दाणे सकाळी उपाशीपोटी चघळून खा आणि त्याचे पाणीही प्या.
काळ्या मिरीत ‘पिपेरिन’ हा घटक असतो, जो चरबीच्या पेशी तोडण्यास मदत करतो आणि नवीन चरबी तयार होण्यापासून रोखतो. त्यामुळे कॅलरी जास्त प्रमाणात जळतात. सेवन कसे करावे: ४–५ काळी मिरीचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी प्या किंवा सूपमध्ये काळी मिरीची पावडर मिसळून घ्या.
थोडक्यात, घरातील साधे मसाले योग्य प्रमाणात आणि नियमितपणे वापरले, तर ते वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय ठरू शकतात. मात्र, कोणताही उपाय करताना संतुलित आहार आणि हलका व्यायाम यांची जोड देणे तितकेच महत्त्वाचे आहे.