
फोटो सौजन्य - Social Media
जगभरात दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन जगण्याच्या बाबतीत जपानमधील लोक आघाडीवर आहेत. विशेषतः ओकिनावा या भागात शंभर वर्षांहून अधिक वय जगणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. वृद्धावस्थेतही तंदुरुस्त, सक्रिय आणि आजारांपासून दूर राहण्यामागे नेमकं काय गुपित आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, यामागे महागडी औषधे किंवा सप्लिमेंट्स नसून जपानी लोकांच्या साध्या, शिस्तबद्ध आणि आरोग्यपूरक जीवनशैलीतच याचे उत्तर दडलेले आहे. जपानी संस्कृतीत अन्नाकडे केवळ पोट भरण्याचे साधन म्हणून पाहिले जात नाही, तर ते औषधासारखे मानले जाते. याउलट आपल्याकडे अनेकदा चवीच्या नादात थाळीत कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट) प्रमाण जास्त आणि पोषकतत्त्वांचे प्रमाण कमी राहते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या समस्या लवकर उद्भवतात आणि अकाली वार्धक्य येते.
याच संदर्भात आरोग्य मार्गदर्शिका डॉ. शालिनी सिंग सोलंकी यांनी जपानी जीवनशैलीतील काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. त्यानुसार, आपल्याला ‘जपानी बेंटो बॉक्स’ पद्धत अंगीकारण्याची गरज आहे. बेंटो बॉक्समध्ये कार्बोहायड्रेट कमी, प्रोटीन मध्यम आणि फायबरयुक्त पदार्थ (भाज्या, सॅलड) सर्वाधिक प्रमाणात असतात. भारतीय जेवणात रोटी-भात जास्त आणि भाज्या-दाळी कमी असतात. जर आपण धान्याचे प्रमाण कमी करून भाज्या आणि डाळी वाढवल्या, तर अनेक आजार टाळता येऊ शकतात. जपानी दीर्घायुष्याचे दुसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘हारा हाची बू’. याचा अर्थ पोट फक्त ८० टक्केच भरावे. पूर्णपणे तृप्त होईपर्यंत खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण पडतो आणि शरीरात सूज वाढते. ८० टक्के नियम पाळल्यास अति खाणे टाळले जाते आणि मेटाबॉलिज्म संतुलित राहतो.
जेवणाची क्रमवारीही तितकीच महत्त्वाची आहे. बहुतेक जण आधी भात किंवा भाजी-चपाती खातात; मात्र डॉ. सोलंकी ‘वेजीज फर्स्ट’चा सल्ला देतात. म्हणजेच जेवणाची सुरुवात सॅलड, कच्च्या भाज्या किंवा आंबवलेले पदार्थ (दही, लोणचं) यांपासून करावी. त्यानंतर शिजवलेल्या भाज्या आणि शेवटी धान्य घ्यावे. या पद्धतीमुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि शरीराला पोषकतत्त्वे योग्यरीत्या मिळतात. जपानी लोक खोल तळलेले पदार्थ टाळतात. ते स्टीमिंग, बॉइलिंग, ग्रिलिंग किंवा हलक्या आचेवर शिजवण्यावर भर देतात. जास्त तेल आणि जास्त तापमानात बनवलेले अन्न पोषकतत्त्वे गमावते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते. कमी तेलात, साध्या पद्धतीने बनवलेले अन्न दीर्घायुष्याचे महत्त्वाचे गमक आहे.
तसेच दूध घातलेली चहा-कॉफी जास्त प्रमाणात घेण्याऐवजी ग्रीन टीचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ग्रीन टीमध्ये ‘कॅटेचिन’सारखे प्रभावी अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि हृदयरोगांचा धोका कमी करतात. दिवसातून एक-दोन कप ग्रीन टी मेटाबॉलिज्म सुधारण्यास आणि वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यास उपयुक्त ठरते. थोडक्यात, जपानी लोकांचे दीर्घायुष्य हे साध्या आहारशैली, संयमित खाण्याच्या सवयी आणि नैसर्गिक पद्धतींमध्ये दडलेले आहे. हे छोटे बदल आपणही दैनंदिन जीवनात स्वीकारले, तर निरोगी आणि दीर्घ आयुष्याकडे नक्कीच वाटचाल करू शकतो.