फोटो सौैजन्य - Social Media
दररोजच्या दगदगत्या जीवनाचा कंटाळा जरी आला असला तरी तोच जगण्याचा उदरनिर्वाह आहे. हेच लक्षात ठेऊन मुंबई-ठाणेकर दररोज सकाळ-संध्याकाळ लोकलचे धक्के खात असतो. आता तर याची त्यांना सवयच झाली आहे म्हणा! पण या प्रवासामध्ये कधी-कधी असे काही घडून जाते, ज्याची छटा मनाच्या मनावर आयुष्यभरासाठी उमटते. असेच काही कळव्यात राहणाऱ्या विजयसोबत घडले होते. विजय दररोज कळवा ते अंधेरी कामासाठी प्रवास करतो. सगळं काही नीट सुरु होते. पण एक रात्र अशी आली की विजयच्या मनामध्ये घर करून गेली. अंगातून घामाच्या धारा काढणारी ती रात्र काय होती? चला तर मग जाणून घेऊयात.
विजयची नाईट शिफ्ट होती. रात्रीचे आठ वाजले होते. घाईगडबडीत तयारी करून विजय कळवा स्थानकावर येऊन थांबला. सगळं काही नीट नेटकं होतं. कळवा स्टेशनवर चालताना त्याची नजर एका स्त्रीवर पडली. तिच्या नजरेला काही क्षणासाठी नजर भिडली आणि तो त्याच्या वाटेवर चालून गेला. स्थानकावर CSMT कडे जाणारी लोकल लागली होती. विजय त्या लोकलमध्ये जाऊन डब्याच्या एका टोकाला असणाऱ्या लांबलचक बाकड्याच्या मध्यभागी जाऊन बसला. सगळं काही व्यवस्थित होतं.
लोकल कळव्याहून ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. बघता-बघता विजयचा डोळा लागला. काही १५ मिनिटे झाली असतील विजयच्या कानावर कुजबुज सुरु झाली. वाऱ्यामध्ये एक थंडावा पसरला होता. त्या गर्दीत कुणीतरी एकाला विचारले की ‘भाई… कोणता स्टेशन आला?’ तेव्हा त्या व्यक्तीने उच्चारले ‘कोपर’. तेव्हा विजयचे डोळे दचकून उघडले. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेर अंधार आणि घनदाट झाडी होती. पाहता पाहता कोपर स्टेशन आला. विजय पटकन उठून स्टेशनवर उतरला आणि बाकावर जाऊन बसला.
विजय विचारात होता की “हे आपल्यासोबत काय घडलं?” आपण तर CSMT कडे जाणारी लोकल पकडली होती. मुळात, जरी कुठल्या धुंदीत कसाराकडे जाणारी ट्रेन पकडली असली तरीही या वेळेला तिथे जाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. आपण ज्या लोकलमध्ये चढलो तिथे मुळीच गर्दी नव्हती म्हणजे नक्कीच आपण CSMT कडे जाणारी ट्रेन पकडली. मग आपण कोपरला कसे काय पोहचलो? आपण ज्या जागेवर बसलेलो तिथेच आपण बसलो होतो, मग त्यावेळी रिकामी असणारी ट्रेन इतकी अचानक भरली कशी काय? अशा प्रश्नांनी त्याचे डोके भिनभिनत होते. पण त्याने ते सगळे सोडून अंधेरीच्या दिशेने निघाला. त्यानंतर त्याच्या सोबत असे कधीच घडले नाही पण ही घटना त्याच्या मनात वास्त्यव्य करून आहे.