
फोटो सौजन्य - Social Media
काही संशोधन झाले आहेत त्यानुसार विवाहित लोकांना विसराळूपणा अर्थात डिमेंशिया होण्याचा धोका अविवाहितांपेक्षा जास्त असतो. हे संशोधन अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने केले असून, यात २४,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व लोक चार गटांमध्ये विभागले गेले होते: विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा किंवा विधुर. तब्बल 18 वर्षांपर्यंत त्यांच्या आरोग्यावर संशोधकांनी बारकाईने लक्ष ठेवले आणि या दीर्घकालीन अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला. त्यानुसार, जे लोक अविवाहित होते म्हणजेच जे एकटे राहत होते किंवा घटस्फोट घेतले होते, त्यांना डिमेंशिया होण्याचा धोका विवाहित लोकांच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांनी कमी होता. ही माहिती अनेक लोकांना आश्चर्यचकित करणारी आहे, कारण आजवर असे मानले जात होते की, विवाहित लोक अधिक आनंदी, सुरक्षित आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असतात.
डिमेंशिया ही एक गंभीर आणि हळूहळू वाढणारी मेंदूविकाराची स्थिती आहे, जिचा परिणाम व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर, विचार करण्याच्या क्षमतेवर आणि निर्णय घेण्यावर होतो. यामध्ये अल्झायमर, व्हॅस्क्युलर डिमेंशिया, पार्किन्सन्स अशा अनेक मेंटल डिसऑर्डर्सचा समावेश होतो. 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. भारतात सध्या अंदाजे 40 लाखांहून अधिक डिमेंशिया रुग्ण आहेत, तर जगभरात ही संख्या 5.5 कोटींपेक्षा जास्त आहे.
डिमेंशियाचे लक्षणे हळूहळू दिसू लागतात. उदाहरणार्थ, एखादी वस्तू कुठे ठेवली हे विसरणे, घराचा रस्ता विसरणे, छोट्या छोट्या निर्णयांमध्ये गोंधळणे, दिवसेंदिवस मूडमध्ये बदल जाणवणे, तसेच एकावेळी एकच काम नीट करता येणे अशा त्रासांची सुरुवात होते. हे लक्षणे सुरुवातीला सामान्य वाटू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
या आजाराच्या मुख्य कारणांमध्ये मेंदूला झालेला स्ट्रोक किंवा दुखापत, व्हिटॅमिन्सची कमतरता, ब्रेन ट्यूमर, थायरॉईडचा असंतुलन, वाढते वय आणि नशेचे व्यसन यांचा समावेश होतो. याशिवाय मानसिक ताणतणाव आणि सामाजिक एकटेपणाही मेंदूवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. संशोधकांच्या मते, विवाहानंतर बहुतांश लोकांचे जीवन त्यांच्या कुटुंबापुरतेच मर्यादित होते. ते सामाजिक उपक्रमांमध्ये कमी सहभागी होतात, बाहेरील जगाशी संपर्क कमी होतो आणि परिणामी त्यांच्या मेंदूवर मानसिक भार वाढतो. शिवाय, नातेसंबंधांतील जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि तणाव यामुळेही ब्रेनवर प्रेशर येते. याउलट, अविवाहित लोक अधिक स्वतंत्र असतात, त्यांना वेळेचे बंधन कमी असते, ते फिरायला, मित्रमैत्रिणींमध्ये वेळ घालवायला मोकळे असतात आणि त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य तुलनेने चांगले राहते.
डिमेंशिया टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की रोज व्यायाम किंवा योगासन करणे, संतुलित आणि पोषणमूल्यांनी भरलेला आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, दारू आणि सिगरेट यांसारख्या व्यसनांपासून दूर राहणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे व सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे. मेंदू जितका सक्रिय राहील, तितका तो दीर्घकाळ निरोगी राहतो.