फोटो सौजन्य - Social Media
ख्रिश्चन धर्मामध्ये Good Friday या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मुळात, ते क्रूसवर अत्यंत वेदनादायक पद्धतीने आसमंती विलीन झाले. तरीदेखील, ख्रिश्चन धर्मामध्ये हा दिवस शुभ किंवा गुड मानला जातो. त्यामागे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या बलिदानामागील हेतू हे कारण आहे. मानवजातीच्या उद्धारासाठी आणि पापांपासून मुक्तीसाठी प्रभूंनी आपल्या जीवाची आहुती दिली, त्यामुळे या दिवसाला शुभ मानले जाते.
गुड फ्रायडे हे नाव कुठून आले याबाबत मतभेद आहेत. काही जण म्हणतात की ‘गुड’ हा शब्द ‘गॉड्स फ्रायडे’ मधून विकसित झाला, तर काही जण त्याचा अर्थ धार्मिक दृष्टिकोनातून घेतात. कारण या दिवशी देवाचा उद्धाराचा कार्य संपूर्ण झाले. जरी येशूचे शिष्य, परिवार व अनुयायी त्यावेळी हे समजू शकले नाहीत, तरी तीन दिवसांनंतर जेव्हा येशू पुनरुत्थित झाले, तेव्हा त्यांना या दिवशीचे खरे महत्त्व समजले की मृत्यूवर आणि पापावर विजय मिळवला गेला.
या दिवशी घडलेल्या घटनांमध्ये येशूचा शिष्य ज्यूदास याने त्यांना पकडण्यासाठी शत्रूंना ठिकाण सांगितले. त्यानंतर येशूला पकडून सानहेद्रीन या ज्यू गटासमोर न्यायासाठी उभं केलं. खोट्या आरोपांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि रोमन गव्हर्नर पिलात याच्याकडे मृत्युदंडासाठी नेण्यात आलं. पिलातने दोष नसतानाही जनतेच्या दडपणामुळे त्यांना क्रूसावर चढवण्याची आज्ञा दिली.
प्रभू येशूंना काट्यांचा मुकुट घालण्यात आला आणि क्रूस उचलून नेण्यास भाग पाडले गेले. शेवटी, त्यांना मध्यभागी क्रूस वर खिळवण्यात आलं. सहा तासांच्या यातनांनंतर येशूने “हे पिता, माझा आत्मा तुझ्या हाती देतो,” असं म्हणून प्राण सोडले. त्याच वेळी अंधार पसरला, मंदिराचा पडदा फाटला, आणि पृथ्वी हादरली.
या दिवशी अवघा मानवजण आपले पाप, आपली मर्यादा आणि येशूने आपल्यासाठी दिलेलं बलिदान याची जाणीव ठेवतो. आपल्याला पवित्र करण्यासाठी आणि देवाच्या सान्निध्यात आणण्यासाठी येशूने स्वतःचा जीव दिला. त्यामुळेच गुड फ्रायडे हा दुःखद असूनही शुभ दिवस मानला जातो कारण त्याच दिवशी आपला उद्धार शक्य झाला.