
गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात मुंबईकरांच्या फुफ्फुसांना हानी! बांधकामांची धूळ आणि सूक्ष्म प्रदूषकांचा श्वसनावर होतोय परिणाम
Health Update: मुंबईच्या हवेत मिसळणारी वाहनांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि सूक्ष्म प्रदूषकांचा मारा फुप्फुसांच्या आरोग्यासमोर गंभीर आव्हान निर्माण करत आहे. अशा वातावरणात दमा, सीओपीडी दीर्घकालीन फुफ्फुसरोग आणि इतर श्वसनविकारांचा त्रास वाढू शकतो. मुंबईतील क्षयरोगाचे मोठे आव्हानही कायम आहे. २०२५ मध्ये शहरात ५४,३९० क्षयरुग्णांची नोंद झाली. त्यामुळे फुप्फुसांचे आरोग्य जपण्याचा प्रश्न वैयक्तिक सवयींपुरता नसून स्वच्छ हवेच्या सार्वजनिक प्रश्नाशी जोडला गेला आहे. बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी जागतिक फुप्फुस आरोग्य दिनानिमित्त या आव्हानाकडे लक्ष वेधले जात आहे.(फोटो सौजन्य – istock)
वरिष्ठ फुप्फुसरोग व समूह क्षयरोग रुग्णालय, शिवडीचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांच्या मते, वाहनांचे उत्सर्जन, बांधकामांची धूळ, औद्योगिक प्रदूषण, धूम्रपान आणि घरातील धूर हे फुप्फुसांच्या आरोग्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने खोकला, घरघर आणि धाप लागण्याचा त्रास वाढू शकतो, विशेषतः दमा आणि सीओपीडीच्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्याच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या माहितीनुसार, ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ या शंभर दिवसांच्या अभियानात महाराष्ट्रात ६१ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातून ४२ हजार १७५ क्षयरुग्णांचे निदान करून निक्षय पोर्टलवर नोंदणी करण्यात आली. या काळात ४४ हजार ५०६ निक्षय शिबिरे आयोजित करण्यात आली.
डॉ. ननावरे यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत २०२५ मध्ये नोंदवलेल्या ५४ हजार ३९० क्षयरुग्णांपैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईतील रहिवासी होते. नोंदवलेल्या रुग्णांमध्ये सुमारे ४० टक्के फुप्फुसाबाहेरील क्षयरोग, सहा टक्के बालक्षयरोग आणि आठ टक्के औषधप्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण होते. गर्दीची घरे, अपुरे वायुवीजन आणि कुपोषणामुळे प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व अधिक वाढते.
क्षयरोगातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांच्या फुप्फुसांचे नुकसान कायम राहू शकते.
त्यामुळे आवश्यकतेनुसार श्वसनक्षमता तपासणी आणि पुनर्वसन महत्वाचे ठरते.
दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला, रक्तमिश्रित भुंकी, वजन घटणे किंवा सतत धाप लागणे अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करावी, असा सल्ला डॉ. ननावरे देतात.
धूम्रपान टाळणे आणि प्रदूषणाचा संपर्क कमी करणे आवश्यक असले, तरी बांधकामांची धूळ नियंत्रित करणे व स्वच्छ हवा उपलब्ध करून देणे हीदेखील सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी आहे, असे ननावरे यांनी म्हटले आहे.
Ans: बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे श्वसनमार्गाला त्रास, खोकला, घशात खवखव आणि दम लागण्यासारखी लक्षणे जाणवू शकतात.
Ans: PM2.5 हे अतिसूक्ष्म कण असून त्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असतो. PM10 कणांचा व्यास 10 मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असतो.
Ans: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दमा किंवा फुफ्फुसांचे आणि हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींना वायुप्रदूषणाचा अधिक त्रास होऊ शकतो.