
धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता 'उत्तम' कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट
Mumbai News: मुंबई शहरात सुरू असलेल्या शेकडो बांधकामांच्या ठिकाणी धूळ आणि प्रदूषणाचे लोट हवेत पसरत असताना प्रत्यक्षात मात्र तेथील हवा गुणवत्ता दर्शक यंत्रांवर प्रदूषणाची पातळी ‘शून्य’ किंवा अवधी ‘एक अंकी’ नोंदवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांद्रा आणि खार परिसरातील बांधकामांच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या या यंत्रांच्या अचूकतेवर ‘आवाज फाउंडेशन’ने थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा संशयास्पद यंत्रांची कसून तांत्रिक तपासणी आणि प्रमाणीकरण केल्याशिवाय त्यांची आकडेवारी महापालिकेच्या अधिकृत नोंदींमध्ये समाविष्ट करू नये, अशी जोरदार मागणी फाउंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दुलअली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
आवाज फाउंडेशनने मार्च ते मे आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बांद्रा व खार परिसरातील बांधकामस्थळांवरील यंत्रांची ३८ दिवसांत २३० वेळा छायाचित्रे घेऊन पाहणी केली.२३ मार्च ते ५ मे या कालावधीत २६ दिवस या यंत्रांवरील नोंदींची तुलना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ अॅपवरील खेरवाडी व बीकेसी येथील अधिकृत हवा गुणवत्ता केंद्रांच्या आकडेवारीशी केली. या तौलनिक अभ्यासात अधिकृत केंद्रांच्या आणि बांधकामस्थळांवरील यंत्रांच्या नोंदींमध्ये प्रचंड मोठी तफावत उघडकीस आली. या काळात सलग आठ दिवस खेरवाडी किवा बीकेसी येथील केंद्रांवर ‘पीएम १०’ प्रदूषकाची नोंद प्रति घनमीटर १०० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक असताना, जवळच सुरू असलेल्या प्रत्यक्ष बांधकामस्थळांवर मात्र प्रदूषण नसल्यासारखी नोंद दाखवली जात होती.
पाली हिलमधील नरगिस दत्त रस्त्यावरील एका सक्रिय बांधकामस्थळावर १३ आणि २४ एप्रिल रोजी ‘पीएम २.५’ या घातक सूक्ष्म कणांची नोंद चक्क ‘शून्य’ दाखवण्यात आली होती; तर २४ एप्रिल रोजी ‘पीएम १०’ची नोंदही शून्य होती.विशेष म्हणजे, १३ एप्रिलला याच यंत्रावर ‘पीएम १०’ची पातळी ३४ असताना ‘पीएम २.५’ मात्र शून्य नोंदवले गेले. सक्रिय बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अशी शून्य नोंद येणे केवळ अशक्य असल्याने ही यंत्रे सदोष, छेडछाड केलेली किंवा दिशाभूल करणारी असल्याचा संशय बळावला आहे.
पाहणी केलेल्या २६ दिवसांपैकी तब्बल १६ दिवस किमान एका यंत्रावर ‘पीएम २.५’ची नोंद प्रति घनमीटर १० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी दाखवली गेली. २९ आणि ३१ मार्च रोजी तर सहापैकी पाच यंत्रांवर’ पीएम २.५’ शून्य ते नऊ दरम्यान होते, तर ३ एप्रिलला खेरवाडीत ‘पीएम १०’ ९१ आणि बीकेसीत १३३ असताना बांधकामांवरील यंत्रे मात्र हवेची स्थिती उत्तम असल्याचा आभास निर्माण करत होती.