Nagpanchmi 2025 : भारतातील 5 फेमस आणि रहस्यमय नाग मंदिर; इथे जाताच सर्व समस्यांपासून होईल मुक्तता
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि याच महिन्यात येणाऱ्या नाग पंचमीच्या सणालाही विशेष स्थान दिले गेले आहे. नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा नाग पंचमीचा सण २९ जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष दूर होतो. म्हणूनच या दिवशी लोक नागांना दूध अर्पण करून त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी येण्यासाठी आशीर्वाद मागतात.
भारतात अनेक नाग मंदिरं आहेत, पण आज आपण अशा ५ रहस्यमय आणि प्रसिद्ध नाग मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत, जेथे पूजाअर्चा केल्यास कालसर्प दोषाचा प्रभाव दूर होतो. भारताच्या विविध भागांतील या प्रसिद्ध नाग मंदिरांना भेट देणे म्हणजे केवळ अध्यात्मिक समाधान नव्हे, तर जीवनातील अडथळे दूर होण्याची श्रद्धाही. नाग पंचमीच्या शुभमुहूर्तावर या मंदिरांमध्ये पूजा केल्यास अनेकांना आपल्या कुंडलीतील दोषांपासून मुक्ती मिळाल्याचा अनुभव आहे.
नागचंद्रेश्वर मंदिर, उज्जैन (मध्यप्रदेश)
महाकालाच्या नगरीत असलेल्या उज्जैनमध्ये एक खास नागमंदिर आहे – नागचंद्रेश्वर मंदिर. हे मंदिर महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर स्थित असून वर्षातून फक्त एकदाच, नाग पंचमीच्या दिवशी भक्तांसाठी उघडले जाते. मान्यता आहे की येथे नागराज तक्षक स्वतः विराजमान आहेत आणि येथे पूजा केल्याने सर्पदोष दूर होतो.
सेम-मुखेम नागराज मंदिर, टिहरी (उत्तराखंड)
उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यात वसलेले सेम-मुखेम नागराज मंदिर पर्वतराजाच्या टोकावर वसलेले आहे. येथे नागराजाची स्वयंभू शिला आहे. स्थानिकांच्या मते, द्वारका नगरी जलसमाधी घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण नागराजाच्या रूपात येथे प्रकट झाले होते. असेही मानले जाते की या गावाची स्थापना पांडवांनी केली होती.
वासुकी नाग मंदिर, प्रयागराज (उत्तर प्रदेश)
प्रयागराजच्या संगमाजवळील दारागंज भागात वसलेले वासुकी नाग मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या नागदेवतेला शेषनाग, अनंत, सर्पनाथ आणि सर्वाध्यक्ष अशा विविध नावांनी ओळखले जाते. शिवाच्या गळ्यात वासुकी नाग वास करत असल्याची धार्मिक मान्यता आहे. येथे पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होतो, असे मानले जाते.
मन्नारशाला नाग मंदिर, अलेप्पी (केरळ)
केरळमधील अलेप्पी जिल्ह्याजवळ असलेले मन्नारशाला नाग मंदिर हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. १६ एकराच्या हिरवळीने वेढलेले हे मंदिर हजारो नागमूर्तींसह बांधलेले आहे. येथे नागराज आणि नागयक्षी यांच्या मूर्तीही आहेत. या मंदिरातील पूजाअर्चा फक्त नम्बूदिरी ब्राह्मण कुटुंबातील लोकच करतात. काही मान्यतेनुसार, या कुटुंबातीलच एका स्त्रीच्या गर्भातून नागराज जन्माला आले होते.
त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक (महाराष्ट्र)
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे वेगळे नागमंदिर नसले तरीही ‘नारायण नागबली’ पूजा केली जाते, जी कालसर्प दोष निवारणासाठी प्रसिद्ध आहे. येथे विधिवत पूजा करून नाग-नागिणीचे जोडपे नदीत सोडल्यास कालसर्प योग दूर होतो, अशी श्रद्धा आहे. तसेच येथे त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प दोष निवारणासाठी अनेक भाविक दरवर्षी गर्दी करतात.