उपवासाचे फ्यूजन पदार्थ
उपवासाचा डोसा
आपण आजवर तांदळाच्या पिठाचा डोसा तर अनेकदा खाल्ला आहे पण उपवासाचा डोसा या पदार्थाविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? भगर आणि साबुदाण्यापासून हा उपवासाचा डोसा तयार केला जातो. साबुदाणा ५ तास पाण्यात भिजवून मग एका मिक्सरच्या भांड्यात याला घाला. यात भगर, दही, हिरवी मिरची, जिरे आणि थोडे पाणी घालून डोश्याचे पीठ तयार करा. पिठात मीठ घाला आणि गरम तव्यावर याचे कुरकुरीत डोसे तयार करा. हा उपवासाचा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.
उपवासाची टिक्की
कुरकुरीत चवीची बटाटा टिक्की तर आपण खाल्ली आहे. उपवासात हिच टिक्की आपण थोड्या हटके स्टाईलमध्ये तयार करणार आहोत. यासाठी उकडलेल्या बटाट्यांमध्ये सैंधव मीठ, काळी मिरी आणि थोडे शिंगाड्याचे पीठ मिसळा आणि टिक्की तयार करा. आता तव्यावर तेल टाकून तयार टिक्की कुरकुरीत शॅलो फ्राया करा.
राजगिऱ्याची पुरी आणि उसळ
उपवासात भाजी-पुरी खाण्याची क्रेव्हिंग होत असल्यास तुम्ही राजगिऱ्याच्या पिठापासून कुरकुरीत पुरी तयार करु शकता. यासाठी एका बाउलमध्ये राजगिऱ्याचे पिठ, मीठ, चमचाभर किसलेले गुळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मळून घ्या. एका प्लॅस्टिकच्या पिशवीवर थोडे तेल लावून यावर तयार पिठाच्या पुऱ्या थापा आणि गरम तेलात पुऱ्या कुरकुरीत तळा. भाजीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून खमंग चवीची उसळ तयार करा. ही बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याची कुरकुरीत पुरी यांचे काॅम्बीनेशन कमाल लागते.






