तुमचा DNA तर तुमच्या स्ट्रेसचे कारण नाही? हे आहेत Genetic Stress चे 3 संकेत; वेळीच व्हा सावध
आजकालच्या कामाच्या आणि घाईगडबडीच्या जीवनशैलीत लोकांमध्ये तणावाचे प्रमाण फार वाढू लागले आहे. मग हा ताण कामाचा असोत अथवा कौटुंबिक, अनेक कारणांमुळे लोकांना तणावाला बळी पडावे लागते. आजकाल ताणतणाव ही एक सामान्य मानसिक आरोग्य समस्या बनली आहे. सामान्यतः, ताण हा मेंदूशी संबंधित समस्या मानली जाते. परंतु जर आम्ही तुम्हाला म्हटले की, ते तुमच्या जीन्स, हार्मोन्स आणि उर्जेशी देखील जोडलेले आहे तर? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण बऱ्याचदा आपल्या तणावाचे कारण आपले जीन्स देखील असू शकतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ताणही असतो जेनेटिक
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ताण तुमच्या डीएनएमध्ये देखील असू शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकले. फरीदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजीचे संचालक डॉ. विनीत बंगा म्हणतात की सुमारे ८०% भारतीयांना नियमित ताण येतो, ज्यामध्ये महिलांमध्ये हा ताण जास्त आढळतो. हे सहसा बदलत्या जीवनशैलीमुळे घडते, परंतु ताण फक्त तुमच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींबद्दल नाही. तुमचा मेंदू आणि शरीर कसे प्रतिक्रिया देतात याबद्दल देखील ते आहे. संशोधन असेही सुचवते की काही लपलेले अनुवांशिक गुणधर्म, ज्यांना एंडोफेनोटाइप्स म्हणतात, हे आपल्याला येणाऱ्या तणावासाठी कारणीभूत ठरत असतात.
टीकांबाबद सेन्सिटिव्ह असणे
जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना लहान सहान कमेंट्समुळे त्रास होतो, तर तुमचा ताण सामान्य ताणापेक्षा वेगळा असू शकतो. हे तुम्हाला अनुवांशिक ताणतणावाचा सामना करावा लागत असल्याचे लक्षण आहे.
तणावामुळे लक्ष केंद्रित करण्यास येते अडचण
जर तुम्हाला तणावाच्या काळात कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात, निर्णय घेण्यात किंवा तुमचे काम पूर्ण करण्यात अडचण येत असेल, तर हे अनुवांशिक ताण असू शकतो.
किरकोळ तणावात शारीरिक त्रास होणे
जर किरकोळ ताणामुळे तुमचे हृदय जलद गतीने धडधडत असेल, तुम्हाला घाम फुटत असेल किंवा छोट्या छोट्या तणावपूर्ण घटनांनंतर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर हे तुम्हाला अनुवांशिक तणाव असल्याचे सूचित करते.
तणावाचे व्यवस्थापन कसे करावे
तणावाचा त्रास जाणवत असल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या होणार त्रास काही प्रमाणात कमी करता येतो. यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा, कारण व्यायाम तुमचा ताण थेट कमी करत नसला तरी तो तुमची भावनिक तीव्रता कमी करू शकतो, तुमचे विचार मोकळे करू शकतो आणि समस्यांकडे शांतपणे पाहण्यास मदत करू शकतो. तणावाचा सामना करताना आपल्या प्रियजनांची मदत घेणेही महत्त्वाचे असते. सहकारी, मित्र आणि कुटुंबीय यांचे समर्थन तुमच्या अडचणी सोडवण्यात मदत करू शकते आणि वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी देते. कामाच्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि अतिविचार करणे टाळा.
तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीवर जास्त भर द्या यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. स्वतःला नवनवीन आव्हाने देऊन कामात किंवा कामाच्या बाहेरही नवीन ध्येये ठरवा; यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि तणावाशी सामना करण्याची ताकद मिळते. तणाव कमी करण्यासाठी अल्कोहोल, धूम्रपान किंवा कॅफिन यासारख्या वाईट सवयींवर अवलंबून राहू नका, कारण त्या आरोग्यासाठी घातक आहेत. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.