
स्वादुपिंडाच्या कर्करोगाची जागृती करणारा महिना
सध्या स्वादुपिंडाचा कर्करोग जागरूकता महिना चालू आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग जेव्हा स्वादुपिंडात घातक पेशी तयार होतात तेव्हा दिसून येतो. हे एक्सोक्राइन किंवा एंडोक्राइन ग्रंथींच्या कार्यासह स्वादुपिंडाचे कार्यावर परिणाम करते. स्वादुपिंड ही ओटीपोटात स्थित एक ग्रंथी आहे जी पाठीचा कणा आणि पोट यांच्यामध्ये स्थित आहे.
हे हार्मोन्स तयार करते जे रक्तातील साखरेची पातळी आणि पचनासाठी आवश्यक एन्झाईम्सचे नियमन करतात. स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या (Pancreas) कोणत्याही भागात होऊ शकतो, परंतु बहुतेक स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या वरच्या भागात दिसून येतो. डॉ. दीपक छाबरा, ऑन्को सर्जन, लीलावती हॉस्पिटल मुंबई यासंदर्भात माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
काय आहेत चिन्हे
स्वादुपिंडाच्या ट्यूमरचे दोन प्राथमिक प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. पहिला प्रकार म्हणजे एक्सोक्राइन ट्यूमर आणि दुसरा न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर स्वादुपिंडाच्या कर्करोगाची चिन्हे म्हणजे त्वचा पिवळी पडणे (कावीळ), गडद रंगाची लघवी, फिकट रंगाचा मल, वरच्या ओटीपोटात दुखणे, पाठीच्या मध्यभागी अस्वस्थता, सतत थकवा, त्वचेला खाज सुटणे, मळमळणे आणि उलट्या होणे, गॅस किंवा सूज येणे, भूक मंदावणे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणे, अचानक वजन कमी होणे आणि नव्याने मधुमेहाचे निदान होणे. जर तुम्हाला अलीकडेच स्वादुपिंडात जळजळ आणि वेदना तसेच मधुमेह किंवा स्वादुपिंडाचा दाह सुरू झाला असेल, तर तुमचे डॉक्टर स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी देखील तुमचे मूल्यांकन करू शकतात.
हेदेखील वाचा – Colorectal Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर का होतो? लक्षण, उपाय आणि कशी घ्यावी काळजी
काय आहेत जोखीम घटक
जोखीम घटकांमध्ये तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन जसे की सिगारेट ओढणे, लठ्ठपणा, विशेषत: पोटाभोवती जास्त वजन आणि मधुमेह, टाइप 2 मधुमेह यांचा समावेश होतो. तीव्र स्वादुपिंडाचा दाह, जो स्वादुपिंडाचा दीर्घकाळ जळजळ आहे, देखील एक भूमिका बजावते. कर्करोगाचा धोका वाढवणारे जेनेटीक सिंड्रोम आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास यासारखे अनेक जोखीमीचे घटक आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक आहे.
उपाय काय आहेत
या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर वेळीच वैद्यकीय सल्ला तसेच उपचार घेणे आवश्यक आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त भाग शस्त्रक्रियेने काढून टाकणे हे एकतर स्वादुपिंड-ड्युओडेनेक्टॉमी किंवा डिस्टल पॅन्क्रिएक्टोमी, ट्यूमरच्या स्थानावर अवलंबून असते.
रेडिएशन थेरपी म्हणजे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी उच्च-वेगाने ऊर्जेचा वापक केला जातो, तर केमोथेरपी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी औषधांचा वापर करते. टोटल पॅन्क्रिएक्टोमी तुमचे संपूर्ण स्वादुपिंड, पित्ताशय, प्लीहा आणि तुमच्या पोटाचा आणि लहान आतड्याचा काही भाग काढून टाकते. शस्त्रक्रियेसह केमोथेरपी, रेडिएशन आणि टार्गेटेड थेरपीचाही सल्ला रुग्णांना दिला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा – 7 पदार्थ जास्त शिजवत असाल तर व्हा सावध! होतो कॅन्सर, पाहा संपूर्ण यादी
प्रतिबंधात्मक उपाय
धूम्रपान आणि मद्यपान टाळा, ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्याचे सेवन करा, साखरयुक्त पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा वापर कमी करा, एस्बेस्टोस आणि कीटकनाशकांसारख्या घातक पदार्थांशी संपर्क कमी करा आणि हा कर्करोग टाळण्यासाठी वजन नियंत्रित राखा.