प्रेमानंद महाराजांना नक्की झालंय तरी काय (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
नुकताच प्रेमानंद जी महाराज यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट @bhajanmarg_official वरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महाराजांची तब्बेत खूपच खराब दिसत असून भक्त भावूक झाले आहेत. महाराज भक्तांना प्रवचन देत असूनही त्यांचे डोळे मात्र उघडू शकत नाहीयेत. त्यांचा चेहरा सुजला असून संपूर्ण लाल झाल्याचे दिसून येत आहे आणि इतकंच नाही तर बोलताना आवाजही कापत आहे. यामुळे भक्तांना त्यांची चिंता वाटू लागली आहे.
व्हिडिओमध्ये महाराज म्हणतात की, ‘ही एक सवय झाली आहे. आपल्याला कितीही त्रास झाला तरी ही प्रथा जात नाही. जोपर्यंत आपण आपल्या देवतेचे स्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळत नाही. देव तुमच्या कष्टाने प्रसन्न होतो, तुमच्या आळशीपणाने नाही.’ हे शब्द ऐकून सोशल मीडियावरील लोक भावुक झाले आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले. भक्तांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे आणि म्हटले आहे की त्यांना या अवस्थेत पाहून दुःख होतंय. त्यांचे म्हणणे आहे की त्यांचा चेहरा पाहून हृदयात नेहमीच आनंद होतो, परंतु आज त्यांना असे पाहून डोळ्यांत अश्रू येत आहेत. प्रेमानंद महाराजजींना काय झाले आहे आणि कोणत्या आजारामुळे त्यांची स्थिती निर्माण झाली आहे ते जाणून घेऊया.
नक्की काय झाले?
वृंदावनमधील प्रसिद्ध संत बाबा प्रेमानंद जी महाराज यांना पॉलिसिस्टिक किडनीचा आजार आहे आणि हा आजार अनुवंशिक आहे. यामध्ये हळूहळू किडनी काम करणे बंद करते. या आजाराबाबत प्रेमानंद महाराज यांना खूप वर्षापासून माहीत आहे आणि त्यांच्या दोन्ही किडनीमध्ये हा त्रास असून अनेकांनी त्यांना आपली किडनी दान करण्याबाबतही विचारले होते, यामध्ये शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचाही समावेश होता.
प्रत्येक तरुणांना भक्तीमार्ग दाखवणारे; कोण आहेत प्रेमानंद महाराज? जाणून घ्या त्यांचा जीवनपरिचय
पहा व्हिडिओ
केवळ २ वर्ष जगणार डॉक्टरांनी सांगितले होते
प्रोफेसर डॉ. बी.पी.एस. त्यागी यांच्या मते, एकदा प्रेमानंदजींना पोटदुखीचा त्रास झाला, म्हणून ते दिल्लीतील डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि त्यांना जगण्यासाठी फक्त दोन ते अडीच वर्षे उरली आहेत. पण हे ऐकूनही महाराज निश्चिंत राहिले. त्यांनी हे सकारात्मकपणे स्वीकारले आणि म्हणाले की आयुष्यात जे काही घडते ते देवाची इच्छा असते.
दोन्ही किडनी डायलिसिसवर
त्यांनी स्पष्ट केले की, प्रेमानंद महाराज यांचे मूत्रपिंड निकामी होऊनही ते जवळजवळ दोन दशकांपासून डायलिसिसवर आहेत, तरीही शारीरिकदृष्ट्या सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या शांत आहेत. महाराजजी यांनी त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांना नावे दिली आहेत, त्यांनी एका किडनीचे नावे राधा आणि दुसऱ्याचे नाव कृष्ण असे ठेवले आहे.
प्रेमानंद महाराज नेहमी सकारात्मक
डॉ. त्यागी स्पष्ट करतात की प्रेमानंदजींचे सकारात्मक विचार हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे. जेव्हा त्यांना सांगण्यात आले की ते जास्त काळ जगणार नाहीत, तेव्हा घाबरण्याऐवजी त्यांनी शांततापूर्वक आणि भक्तीने जीवन जगण्याचा निर्णय घेतला. डॉ. त्यागी म्हणतात की कोणताही आजार स्वतःहून बरा होत नाही. जर रुग्णाची विचारसरणी सकारात्मक असेल तर तो अर्ध्या आजारावर मात करू शकतो. जर मनात भीती किंवा नकारात्मकता असेल तर आजार वाढत जातो.
पॉलिसिस्टिक किडनीचा आजार आणि लक्षणं?
हा एक जन्मजात आजार आहे ज्यामध्ये मूत्रपिंडाच्या आत लहान, पाण्याने भरलेल्या पिशव्या (सिस्ट) तयार होतात. कालांतराने, हे सिस्ट मोठे होतात, ज्यामुळे मूत्रपिंडाचा आकार वाढतो आणि रक्त स्वच्छ करण्याची त्यांची क्षमता कमी होते.
या आजाराची लक्षणे हळूहळू दिसून येतात. सुरुवातीला रुग्णाला उच्च रक्तदाबाचा अनुभव येऊ शकतो. त्यानंतर कंबरेच्या मागच्या किंवा बाजूला वेदना होतात. हा आजार वाढत असताना, मूत्रपिंडांचा आकार वाढल्याने पोट फुगू लागते. कधीकधी, रुग्णाला मूत्रात रक्त येते किंवा वारंवार मूत्रमार्गाच्या संसर्गाची तक्रार होते. काही लोकांना मूत्रपिंडातील खडे देखील होऊ शकतात. कालांतराने, मूत्रपिंडाची कार्य करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. जर पालकांपैकी एकास हा आजार असेल तर मुलालाही तो होण्याची शक्यता सुमारे ५० टक्के असते.