प्रत्येक तरुणांना भक्तीमार्ग दाखवणारे कोण आहेत प्रेमानंद महाराज? जाणून घ्या त्यांचा जीवनपरिचय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्रेमानंद महाराज, राधाराणीचे परम भक्त आहेत, हे वृंदावनचे प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भजन आणि सत्संगामुळे ते देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी अनेक भक्त, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि नेते वृंदावनला येतात. नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या कुटुंबासह त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या प्रवचनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले आहेत.
प्रेमानंद महाराजांचा जीवन परिचय
प्रेमानंद महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणी त्यांचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते. त्यांच्या कुटुंबात आध्यात्मिक वातावरण होते. त्यांचे वडील, आजोबा आणि मोठा भाऊ भगवंताची भक्ती करत असत, याचा प्रभाव प्रेमानंद महाराजांच्या जीवनावर पडला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे पठण सुरू केले. तेराव्या वर्षी त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला आणि घराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. सुरुवातीला त्यांना “आरयन ब्रह्मचारी” म्हणून ओळखले जाऊ लागले.
संन्यास घेतल्यानंतर प्रेमानंद महाराज वाराणसीला गेले, जिथे ते गंगा नदीत दररोज तीन वेळा स्नान करत आणि ध्यान करत. ते दिवसातून एकदाच जेवण घेत. भिक्षा मागण्याऐवजी, ते काही वेळ वाट पाहत आणि अन्न मिळाले तर ग्रहण करत, अन्यथा गंगाजलावर उपवास करीत. अशा प्रकारे त्यांनी कठोर तपश्चर्या केली.
प्रेमानंद महाराज वृंदावनला कसे गेले
प्रेमानंद महाराज वृंदावनला कसे आले, याची कथा चमत्कारिक आहे. एक अपरिचित संत त्यांना भेटले आणि एका चैतन्य लीला व रासलीला कार्यक्रमासाठी निमंत्रण त्यांना दिले. सुरुवातीला महाराजांनी नकार दिला, पण आग्रहामुळे ते गेले आणि कार्यक्रम पाहून प्रभावित झाले. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना पुन्हा रासलीला पाहण्याची तीव्र इच्छा झाली. त्या संताने सांगितले की, वृंदावनला या, इथे रासलीला रोज पाहता येईल. हे ऐकताच महाराज वृंदावनला आले.
वृंदावनमध्ये त्यांनी राधा वल्लभ संप्रदायात प्रवेश केला आणि राधाराणी व श्रीकृष्णाच्या भक्तीत आपले जीवन समर्पित केले. यानंतर महाराज भक्तीच्या मार्गावर आले. वृंदावनात आल्यानंतर ते राधावल्लभ पंथातही सामील झाले.आज महाराजांच्या सत्संगासाठी आणि दर्शनासाठी हजारो भक्त त्यांच्या आश्रमाला येतात. भक्तांना दर्शनासाठी आधार कार्ड आवश्यक आहे, आणि टोकनद्वारे भेट दिली जाते. त्यांच्या भजनांनी व भक्तीने ते लाखो भक्तांचे मार्गदर्शन करत आहेत.
कसे घ्याल दर्शन?
तुम्हाला जर प्रेमानंद महाराजांचे दर्शन घ्यायचे असेल, तर त्यांच्या वृंदावनातील आश्रमाला, श्री राधाकेली कुंज ला भेट द्या. तुम्ही रात्री 2.30 वाजता त्यांचे दर्शन घेऊ शकता. दररोज हजारो भाविक त्यांना भेटण्यासाठी जमतात. दररोज सकाळी 9.30 वाजता आश्रमात महाराज त्यांच्या शिष्यांना वेगवेगळे टोकन देतात.
या टोकनच्या मदतीने, दुसऱ्या दिवशी महाराजांचे दर्शन घेता येते. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला प्रेमानंदजींशी एकांतात बोलायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला टोकन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता आश्रमात यावे लागेल. यावेळी तुम्ही आश्रमात महाराजांना प्रश्न विचारू शकता.
भारतासह ‘या’ देशांमध्येही साजरी होते मकर संक्रांती; जाणून घ्या काय आहे खास परंपरा